पेपर फुटी रोखणं ही आपली राष्ट्रीय जबाबदारी

’नीट’ परीक्षेच्या वादावर नरेंद्र मोदींची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली /21 जुलै  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’नीट’ पेपर फुटी प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. मंगळवारी झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ’मंगल मिलन’ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पंतप्रधानांच्या भावना प्रसारमाध्यमांसमोर मांडल्या. रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेपर फुटीला जे कोणी जबाबदार असतील, त्यांना कठोरतेत कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. तसेच, अशा प्रकारच्या पेपर फुटीच्या घटना भविष्यात टाळणे ही आपली राष्ट्रीय जबाबदारी असून, परीक्षेची संपूर्ण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि त्रुटीरहित बनवण्यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक
प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीत पंतप्रधानांनी एनडीएच्या मित्रपक्षांना संसदेतील कामकाजात
एकजूट राहण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर, विरोधी पक्षांनीही राजकीय मतभेद बाजूला ठेवून देशाच्या तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कल्याणासाठी संसदेत विधायक काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, पंतप्रधानांचे हे वक्तव्य
अशा वेळी आले आहे, जेव्हा अवघ्या एक दिवसापूर्वीच संसदेकडे मोर्चा काढणार्‍या शेकडो आंदोलक विद्यार्थ्यांवर अश्रुधूर आणि लाठीचाज करण्यात आला होता. हे आंदोलन ’कॉक्रोच जनता पार्टी’या अनोख्या नावाच्या संघटनेच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आले होते. (मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एका वेगळ्या प्रकरणात बेरोजगार तरुणांची तुलना ’झुरळांशी’ केल्यानंतर या संघटनेचा जन्म झाला होता.) हे सर्व संतप्त विद्यार्थी नीट पेपर फुटीसह इतर स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहारांच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button