हिवरखेडजवळ भीषण अपघात : महिला ठार, लहान बालकासह पाच जण गंभीर जखमी
भरधाव ट्रकने ऑटो अन् दुचाकींना उडवले; ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात

मोर्शी /21 जुलै- वरुडकडून येणार्या भरधाव आयशर ट्रकने पॅसेंजर ऑटो आणि बस थांब्यावरील उभ्या दुचाकींना जोरदार धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एका बालकासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा थरारक अपघात मोर्शीपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरखेड बस थांब्यासमोर आज 21 जुलै रोजी संध्याकाळी
साडेसात वाजेच्या सुमारास घडला. तळणी येथील ऑटो क्रमांक एमएच 27 बीडब्ल्यू 8959 मधून सहा प्रवासी हिवरखेडमार्गे बेलोराकडे जात होते. त्याच वेळी वरुडकडून मोर्शीच्या दिशेने अतिवेगाने येणार्या आयशर ट्रक क्रमांक एमएच 28 एबी 7020 ने विरुद्ध बाजूने
येणार्या ऑटोला थेट उडवले. ही धडक इतकी जबरी होती की ऑटोचा जागीच चक्काचूर झाला. यामध्ये ऑटोत बसलेल्या शितल रवींद्र ताथोडे वय 35 वर्षे राहणार बेलोरा/लोणी तालुका वरुड या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्यामाहितीनुसार हिवरखेड बस थांब्यासमोर गतीरोधक असतानाही ट्रकचालकाने वाहनाचा वेग मुळीच कमी केला नाही. ऑटोला उडवल्यानंतर या ट्रकने बस थांब्यावर उभ्या असलेल्या 4 ते 5 दुचाकींनाही चिरडले. यामुळे दुचाकींचे मोठे नुकसान झाले. अपघात घडताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका आणि खाजगी वाहनांद्वारे सर्व जखमींना तात्काळ मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये आबाराव पुंडलिकराव ताथोडे वय 69 वर्षे राहणार बेलोरा, श्लोक रवींद्र ताथोडे वय 13 वर्षे राहणार बेलोरा, प्रज्वल मदन तिडके वय 23 वर्षे राहणार तळणी, आकाश शेषराव भलावी वय 32 वर्षे राहणार तळणी आणि इरफान पठाण वय 30 वर्षे राहणार तळणी यांचा समावेश आहे. या पाचही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना प्राथमिक उपचार देऊन अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच मोर्शी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतले असून मोर्शी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




