वन अधिकार्याच्या घरात सोन्याचा खजिना
दोन ठिकाणच्या छापेमारीत 7.6 कोटी रुपयांची मालमत्ता उघड

भोपाळ/15 नोव्हेंबर- मध्य प्रदेशातील वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्याच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याच्या तक्रारीवरून लोकायुक्त पथकाने मोठी कारवाई केली आहे. सातपुडा व्याघ्र प्रकल्पात कार्यरत उपविभागीय अधिकारी संजीव कुमार शर्मा यांच्या पचमढी आणि छिंदवाडा येथील निवासस्थाने तसेच कार्यालयावर छापे टाकण्यात आले. या कारवाईत सुमारे 7.6 कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाली असून, त्यामध्ये अडीच किलोहून अधिक सोने, सुमारे 1.6 किलो चांदी, 26 लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम, दोन हॉटेल-रिसॉर्ट आणि जमिनीच्या व्यवहारांशी संबंधित 28 दस्तऐवजांचा समावेश आहे. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास लोकायुक्तांच्या दोन पथकांनी एकाच वेळी ही कारवाई सुरू केली. लोकायुक्त पोलीस अधीक्षक सुनील पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पचमढी येथील शर्मा यांचे शासकीय निवासस्थान आणि कार्यालयाची झडती घेतली. दुसर्या पथकाने छिंदवाडा येथील प्रोफेसर कॉलनीमधील त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी तपासणी केली. नर्मदापुरम येथील विशेष न्यायालयाने दिलेल्या शोध वॉरंटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शर्मा यांनी आपल्या ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती. प्राथमिक पडताळणीत त्यांची मालमत्ता ज्ञात उत्पन्नापेक्षा 228 टक्क्यांनी अधिक असल्याचे आढळले होते.





