धामणगाव, धारणी, वरूडमध्ये कमळाची लाट
दर्यापुर, अचलपूर, चांदूर बाजारात तिरंगी लढत

* मतदानातील ट्रेंडमुळे राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत
अमरावती /2 डिसेंबर : जिल्ह्यातील 11 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत आज झालेल्या मतदानाने स्थानिक राजकारणाला नव्या दिशा आणि नवे ताणतणाव दिले आहेत. दिवसभर झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांचा उत्साह लक्षवेधी ठरला. रांगा, चर्चा, पक्षनिष्ठा आणि स्थानिक मुद्द्यांवरून मतदारांचे विचार उमटत असताना बहुतेक ठिकाणी कमलाची लाट जाणवली. सकाळपासूनच मतदानाची टक्केवारी समाधानकारक राहिली आणि ट्रेंड पाहता जिल्ह्यातील अनेक पालिकांत भाजपचे वर्चस्व दिसले.
धामणगाव, धारणी, शेंदुरजना घाट आणि वरूड येथे भाजपची स्थिती अगदी ठाम असल्याचे प्रत्यक्ष मतदानादरम्यान जाणकारांनी नमूद केले. अनेक बूथवरील वळण, उमेदवारांची हालचाल आणि कार्यकर्त्यांची एकत्रित नोंद घेताना या ठिकाणी वातावरण एकतर्फी असल्याचे लक्षात आले.
दर्यापुर, चांदूर बाजार आणि अचलपुर या महत्त्वाच्या शहरांत मात्र परिस्थिती भिन्न होती. येथे तीन पक्षांमध्ये चुरशीची टक्कर पाहायला मिळाली. प्रहार, काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्षामुळे निकाल अधिकच रोचक होणार आहे. चांदूर रेल्वेत ’आपलं चांदूर’ पॅनल आणि भाजपमध्ये थेट सामना तर काँग्रेस मागे राहिल्याचे संकेत मिळाले. नांदगाव खंडेश्वर आणि मोर्शी येथे शिवसेना उबाठाचे उमेदवार भाजपला जोरदार आव्हान देत असल्याचे सूत्र सांगतात. अचलपुर ही जिल्ह्यातील एकमेव अ श्रेणी पालिका. त्यामुळे येथेची लढत सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या रूपाली माथने आणि काँग्रेसच्या नूरस सबहा ऐहतेशाम या दोघींमध्ये तुफान संघर्ष रंगला. शिवसेना उबाठा आणि प्रहारच्या उमेदवारांसह सात जण रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच केंद्रित राहिली. या निवडणुकीचा मान-सन्मान भाजपचे आमदार प्रवीण तायडे आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या प्रतिमेशी जोडला गेल्याने दोन्ही बाजूंनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठे प्रयत्न दिसून आले. दर्यापुरात भाजपच्या नलिनी भारसाकले, काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकले आणि शिवसेना (शिंदे गट) चे प्रदीप मलिये यांच्यात तीव्र त्रिकोणी लढत रंगली. मतदारांची मनःस्थिती दिवसभर गूढ राहिली. येथे 12 प्रभागांतून 25 नगरसेवक निवडले जाणार असून 115 उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले आहे. दर्यापुरातील ही निवडणूक काँग्रेससाठी विशेष महत्त्वाची मानली जाते, कारण स्थानिक पातळीवर पक्षाची पकड टिकविण्याची ही महत्त्वाची संधी आहे. चांदूर बाजारात नगराध्यक्ष पदासाठी भाजपची कांता अहीर, प्रहारची मनीषा नांगलिया आणि काँग्रेसची फरहान तबस्सूम या तिघींमध्ये मुख्य स्पर्धा दिसली. विविध पॅनलमधील पाच उमेदवार रिंगणात असले तरी ही त्रिस्पर्धा अधिक तीव्र होती. शहरातील दहा प्रभागांतून वीस सदस्य निवडले जाणार असून मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने कोणत्याही बाजूचा अंदाज लावणे कठीण आहे. चांदूर रेल्वेत पारंपरिक काँग्रेस गट मागे पडल्याचे प्रत्यक्ष मतदानातून समोर आले. भाजपची स्वाती शेते आणि ’आपलं चांदूर’च्या प्रियंका विश्वकर्मा यांच्यात थेट सामना होत असल्याचे मतदारांनी मतदानानंतर बोलून दाखवले. काँग्रेसची उमेदवार तिसर्या क्रमांकावर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. येथील ईव्हीएम कोर्टाच्या आदेशामुळे उशिरा उघडण्यात येणार असल्याने निकालाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
धामणगाव रेल्वेत मतदानाच्या ट्रेंडने भाजपसाठी सकारात्मक वातावरण तयार केले. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या डॉ. अर्चना रोठे अडसड यांना मतदारांचा स्पष्ट कल दिसून आला. नगरसेवक पातळीवरही भाजपला वाढत असल्याचे चित्र उमटले. सकाळच्या थंडीचा अडथळा न मानता मतदारांनी मतदानासाठी उत्तम प्रतिसाद दिला.एकूणच जिल्ह्यातील आजचे मतदान स्थानिक राजकारणातील अनेक चित्रे स्पष्ट आणि अनेक अनिश्चित केले. बहुसंख्य ठिकाणी कमलाची छाया प्रभावी दिसली, तर काही ठिकाणी तीन बाजूंतील संघर्षामुळे वातावरण अधिकच रंजक झाले. पुढील काही दिवसांत येणारे निकाल अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दाखवत असून जिल्ह्याचे राजकारण नव्या टप्प्यावर जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.
गावगाड्यात राजकीय कुजबुज…-मतदान संपताच सर्वच गावांत राजकीय चर्चांचा तडाका सुरू झाला आहे. धामणगाव, धारणी, वरूड येथे कमल फुलणार अशी जोरदार चर्चा पसरली असून चहाच्या टपर्यांवर येळी कमलच असा सूर ऐकू येत आहे. दर्यापुर, अचलपुर, चांदूर बाजारात मात्र त्रिस्पर्धेमुळे मतदार संभ्रमात पडले, आणि त्यावरून निकाल कसा वळेल काही सांगता येत नाही अशी गावकर्यांत कुजबुज सुरू झाली आहे. चांदूर रेल्वेत भाजप आणि स्थानिक पॅनलमधील थेट संघर्षाचे बोलबाला, तर धामणगावात एकतर्फी चित्र असल्याचेही गावोगावी चर्चेत आहे.




