…म्हणून काँग्रेसने ‘वंचित’ला पाठींबा दिला नाही

अमरावती/18 जून- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख स्वतः अचानक रुग्णालयात दाखल झाले. मात्र, त्यांच्या या कृतीमुळे अमरावती जिल्हा काँग्रेस आयत्या वेळी पेचात सापडली. काँग्रेस नेत्यांनी उमेदवार ठरवताना अत्यंत ढिलाई दाखवली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ही निवडणूक पैशांची आहे, त्यामुळे जो उमेदवार पैसा लावेल, त्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालावी, अशी स्थानिक काँग्रेस नेत्यांची भूमिका होती. मात्र, असा धनवान उमेदवार काँग्रेस नेत्यांना शोधता आला नाही. उलटपक्षी, आपण या निवडणुकीत पैसे लावू, असे म्हणणार्‍या उमेदवारावर राजकारणात मुरलेल्या नेतेमंडळींनी डोळे बंद करून विश्वास ठेवला, हे या निवडणुकीचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण पैलू ठरले.
17 जून रोजी, निवडणुकीच्या पूर्वसंध्येला, काँग्रेस पक्षाकडे मतदान करण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय नव्हता. केवळ हर्षजीत देशमुख यांना मतदान करायचे नाही, यावर मात्र सर्वांचे एकमत झाले होते. मतपत्रिकेवर हर्षजीत देशमुख यांचे नाव राहणार असले तरी, त्यांना काँग्रेसच्या मतदारांनी मतदान करायचे नाही, असे नेत्यांनी ठरवले होते. मात्र, त्यानंतर पुढे काय करायचे, यावर एकमत होऊ शकले नाही. नेत्यांच्या सलग सात बैठकांमधील खल पक्षाला गोंधळात पाडणारा ठरला. कोणालाच काही कळत नव्हते. हर्षजीत देशमुख यांना मतदान करायचे नाही, तर मग मतदानालाच जायचे नाही का? असा सवाल नगरसेवक विचारू लागले होते, ज्याचे उत्तर नेत्यांकडे नव्हते. ही लढाई वैचारिक नसून केवळ पैसे देऊन ही निवडणूक जिंकता येते, यावर काँग्रेस नेते ठाम होते. आम्ही दिलेला आदेश काँग्रेस मतदार पाळतील, असा ठाम विश्वास काँग्रेस नेत्यांना सातत्याने वाटत होता. मात्र, जेव्हा ’व्हीप’ची चाचपणी केली, तेव्हा भयानक वास्तव समोर आले. काँग्रेसच्या नगरसेवकांनी, आम्ही व्हीपचे पालन करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्याचे कारण खूप उघड होते; ही निवडणूक पैशांची असल्याचे जाहीर झाल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांनी तशी सोय केली असावी आणि त्याचे लाभार्थी काँग्रेसचे मतदार होते. त्यामुळे व्हीप काढण्यावरही एकमत नव्हते. अखेर व्हीप काढण्याचा आदेश झाला, तो अमरावती महानगरपालिकेतील नगरसेवकांसाठी होता. ग्रामीण मतदारांनी व्हीप ऐकणार नाही, अशी भूमिका घेतली होती. याला अपवाद काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मतदार संघातले तिवसा येथील मतदार ठरले. बाकी जिल्ह्यात काँग्रेस मतदारांनी मतदान केले आहे. काँग्रेसचा उमेदवार पळून गेल्याने आणि नगरसेवक नेत्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे, नगरसेवकांना मतदानाला जाण्यापासून रोखू नका, असा सूर बाहेर आला. तेव्हा वंचित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याबाबत विचार सुरू झाला. काँग्रेसच्या काही नेत्यांच्या मते, निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देऊन काँग्रेसची मते त्यांना दिली जावीत, मात्र यावर एकमत होऊ शकले नाही. त्यामागे दोन सुस्पष्ट कारणे होती: निवडणुकीच्या एक दिवस आधी हा निर्णय घेणे धोकादायक होते आणि दुसरी गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगितली गेली की, नगरसेवकांचे ठरले आहे आणि आता उशीर झाला आहे. वंचित आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला असता, तर कदाचित राज्यभर चांगला संदेश गेला असता. मात्र, प्रत्यक्षात काँग्रेस उमेदवारांचा कल ठरल्यामुळे आणि तशी तजवीज झाल्यामुळे, ऐनवेळी वंचितच्या उमेदवाराला मते मिळाली नसती आणि त्याचे सगळे खापर काँग्रेस नेत्यांवर फोडल्या गेले असते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेस पक्षाची प्रतिमा राज्यभर मलीन होत असताना, वंचितच्या उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिला असता तरीही, काँग्रेस नगरसेवकांना वंचितच्या उमेदवाराला मतदान करा, अशा प्रकारची सक्ती करता आली नसती. काँग्रेसला पक्ष वाचवण्याची काळजी असून, अत्यंत चुकीचे निर्णय घेतल्यामुळे घर सांभाळण्याची गरज निर्माण झाली आहे. काँग्रेसने वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असता आणि मतदान झाले नसते, तर भविष्यातील राजकारणात प्रचंड मोठी दरी निर्माण झाली असती.

संबंधित बातम्या

Back to top button