महानगरपालिकेचा वर्धापन दिन जनसहभागातून साजरा होणार
12 ते 15 ऑगस्टदरम्यान तिरंगा यात्रा

माजी महापौरांचा सन्मान आणि ‘फोक ललकार’चा सांस्कृतिक जागर
अमरावती/12 ऑगस्ट– महानगरपालिकेच्या वर्धपन दिनाचे औचित्य साधून यंदा केवळ औपचारिक सोहळा न करता ‘सेवा, संस्कृती, पर्यावरण अन् राष्ट्रभक्ती’ या चतुःसूत्रीवर आधारित भव्य लोकत्सव साजरा केला जाणार आहे. 12 ते 15 ऑगस्टदरम्यान चालणार्या या उपक्रमात विविध सामाजिक, आरोग्यविषयक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अन् सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अमरावतीकरांनी यात हिरिरीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 12 ऑगस्टला दुपारी 4 वाजता नेहरू मैदान येथून निघणार्या भव्य ‘तिरंगा यात्रे’ने या उत्सवाचा प्रारंभ होईल. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर निघणारी ही यात्रा शहरात राष्ट्रीय एकात्मता अन् राष्ट्रप्रेमाचा नवा चेतनादायी संदेश पसरवेल. त्यानंतर 13 ऑगस्टला सकाळी 8 वाजता रहाटगाव रिंग रोडवरील कल्पतरू मंगल कार्यालय येथे विशेष वृक्षारोपण मोहीम राबवली जाईल. वाढत्या शहरीकरणाच्या काळात शहराला हिरवेगार करण्यासाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संकल्प या वेळी केला जाणार आहे.
पर्यावरणासोबतच आरोग्याची काळजी घेण्यासाठी 14 ऑगस्टला सकाळी 11 वाजता मोर्शी रोडवरील संत ज्ञानेश्वर सभागृहात रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या उपक्रमातून गरजू रुग्णांना मदत करण्यासोबतच नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती केली जाईल. उत्सवाचा सांगता सोहळा 15 ऑगस्टला सायंकाळी 6:30 वाजता संत ज्ञानेश्वर सभागृहात रंगणार आहे. या वेळी महापालिकेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणार्या माजी महापौरांचा कृतज्ञतापूर्वक विशेष नागरी सत्कार करण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्राच्या लोककलेचे अस्सल दर्शन घडवणारा ‘फोक ललकार’ हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. अमरावती पालिकेची ही वाटचाल अधिक सक्षम अन् लोकाभिमुख करण्यासाठी सर्व नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी या चार दिवसांच्या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.




