अमरावतीत गाडगेबाबा समाधीचा कायापालट होणार

शासनाकडून 25 कोटींचा निधी मंजूर पर्यटनाला मिळणार आता मोठी चालना

अमरावती /12 ऑगस्ट  : विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरावती येथील संत गाडगेबाबा समाधी स्थळ परिसराचा आता पूर्णपणे कायपालट होणार असून, या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने तब्बल 25 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला स्थानिक आमदार सुलभाताई खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. या मोठ्या निर्णयामुळे गाडगेबाबांच्या पावन स्मृती जपण्यासोबतच अमरावतीमधील पर्यटन आणि स्थानिक विकासाला अभूतपूर्व चालना मिळणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या समाधी स्थळाचा कायापालट व्हावा यासाठी आमदार सुलभाताई खोडके या शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होत्या. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून 2023-2024 च्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या या निधीला आता शिखर समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. या योजनेअंतर्गत संत गाडगेबाबा समाधीचा जीर्णोद्धार करण्यासोबतच कुंताबाई समाधीचे सुशोभीकरण केले जाईल. तसेच भाविकांच्या सोयीसाठी श्री संत गाडगे महाराज स्मृती केंद्राचे उर्वरित काम पूर्ण करून ’शेतकरी ग्राम सफाई मिशन सेंटर’च्या तळमजल्याचे नवीन बांधकाम केले जाणार आहे.
याशिवाय दूरवरून येणार्‍या वारकरी आणि भाविकांसाठी यात्री निवासाच्या दुसर्‍या व तिसर्‍या मजल्याचे बांधकाम करण्यात येईल. समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेण्यासाठी अद्ययावत कीर्तन सभागृह, ध्यान केंद्र इमारत, सुसज्ज अंतर्गत रस्ते, मोठा वाहनतळ आणि एक विलोभनीय आकर्षक उद्यान उभारले जाणार आहे. हे सर्व प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आ.सुलभा खोडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे मनापासून आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button