कोरोना योद्ध्यांच्या मागणीसाठी आमरण उपोषण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भरतीत प्राधान्य द्या, जिल्हा रुग्णालयासमोर सात जणांचे आंदोलन सुरू

अमरावती /12 ऑगस्ट- कोरोना काळात कमी वेतनावर जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवेत काम करणार्या चतुर्थ श्रेणी कंत्राटी कर्मचार्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भरती प्रक्रियेत प्राधान्य द्यावे या मागणीसाठी एस.आर.जी. कर्णिक श्रमिक कामगार संघाच्या स्थानिक शाखेने बुधवारपासून जिल्हा रुग्णालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. कोरोना काळात सेवा बजावलेल्या कर्मचार्यांना डावलून भरती प्रक्रिया राबविल्याचा आरोप संघटनेने केला असून मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्था सांभाळताना चतुर्थ श्रेणी कंत्राटी कर्मचार्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक कर्मचार्यांनी अत्यंत कमी वेतनात रुग्णालयांमध्ये सेवा दिली. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कंत्राटी पदांच्या भरतीवेळी कोरोना योद्ध्यांना प्रथम प्राधान्य द्यावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. यासंदर्भात चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाने 4 डिसेंबर 2024 तसेच 23 जानेवारी 2026 रोजी पत्र देऊन मागणी मांडली होती. त्यानंतर 4 मे 2026 रोजी माहितीच्या अधिकारातून भरती प्रक्रिया आणि कंत्राटी कर्मचार्यांशी संबंधित माहितीही मागविण्यात आली. संघटनेच्या म्हणण्यानुसार 19 एप्रिल रोजी झालेल्या चतुर्थ श्रेणी कंत्राटी कर्मचार्यांच्या भरती प्रक्रियेत कोरोना योद्ध्यांना कोणतेही विशेष प्राधान्य देण्यात आले नाही. या प्रश्नावर संबंधित अधिकार्यांकडे अनेकदा पाठपुरावा करूनही ठोस निर्णय झाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरोना काळात सेवा देणार्या कर्मचार्यांवर झालेला अन्याय दूर करून त्यांना योग्य प्राधान्य देण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यापूर्वी संघटनेने प्रशासनाला निवेदन देऊन प्रतिनिधित्वाच्या तारखेपासून आठ दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास 12 ऑगस्टपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता. मात्र मागणीवर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने बुधवारपासून अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
उपोषणाला शाखाध्यक्ष गजानन खंडागळे, सचिव बबलू यादव, कार्याध्यक्ष प्रवीण शेगोकार, उपाध्यक्ष मनोज जोशी, कोषाध्यक्ष मालती सरोदे, टेक्कराज धोटे, गोपाल गोहर, प्रशांत थेते, हरीश राठी, अमित बनागरे, संगीता गवळी, पूजा परिहार, सतीश भावे, मनोज गोहर, मिलिंद तायडे, निलीमा गणवीर, रुपाली खडसे, भागीरथ टांक, बब्बू कसारे, भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशी गजानन खंडागळे, टेकराज धोटे, बबलू यादव, मनोज गोहर, सागर मोहोड, सुनील गायकवाड आणि कलश सूर्यवंशी उपोषणाला बसले. उपोषणाची माहिती जिल्हाधिकारी तसेच कोतवाली पोलिसांसह संबंधित प्रशासनाला देण्यात आली आहे. कोरोना योद्ध्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार संघटनेने व्यक्त केला असून आता प्रशासन या मागणीवर कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




