चिखलदर्याचे नगरसेवक शिंदे सेनेच्या वाटेवर?
आ. बच्चू कडूच्या संपर्कात काही नगरसेवक

मुंबईत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होवू शकतो पक्षप्रवेश
जिल्ह्याच्या राजकारणात पक्षांतराची पुन्हा सुरुवात
चिखलदरा/12 ऑगस्ट – पर्यटननगरी चिखलदर्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, नगर परिषदेत मोठ्या राजकीय घडामोडीच्या चर्चेला उधाण आले आहे. चिखलदरा नगर परिषदेतील काही नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत चिखलदर्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चिखलदरा नगर परिषदेतील काही नगरसेवकांची अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते तथा आ. बच्चू कडू यांच्यासोबत यासंदर्भात चर्चाही झाली आहे. संबंधित नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाबाबत हालचाली सुरू असल्या तरी आज दुपारपर्यंत त्यांच्यातील आपसीताळमेळ पूर्णपणे जुळला नसल्याने नियोजित प्रवेश लांबणीवर पडल्याचे समजते. दरम्यान, चिखलदरा नगर परिषदेतील काही नगरसेवक आज सायंकाळी मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता असून, उद्या किंवा परवा त्यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नगरसेवकांच्या उपस्थितीने चर्चांना अधिक उधाण
विशेष म्हणजे, चिखलदरा नगर परिषदेतील सर्व नगरसेवक आज दुपारपर्यंत चिखलदर्यातच उपस्थित होते. त्यामुळे काही नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतराबाबत सुरू असलेल्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. केवळ राजकीय शक्यतेला हवा मिळत आहे की, पडद्यामागे प्रत्यक्षात पक्षांतराची तयारी पूर्ण झाली आहे, याबाबत सध्या कमालीची गुप्तता पाळली जात आहे. यामुळे चिखलदरा नगर परिषदेतील राजकीय समीकरणे नेमकी कोणत्या दिशेने वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील एक-दोन दिवसांत होणार्या संभाव्य राजकीय घडामोडींमुळे चिखलदर्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




