अमरावती जिल्हा बँकेत 1132 सभासदाच्या मान्यतेवरून राजकीय रणकंदन; आ.तायडे-आ.कडू आमनेसामने

सहकार क्षेत्रातील राजकारण तापले; आगामी निवडणुकीपूर्वी मोठ्या उलटफेराची शक्यता, सर्वांचे लक्ष हायकोर्टाच्या निर्णयाकडे

अमरावती/12 ऑगस्ट – अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. तब्बल 1132 नव्या सभासदांच्या सदस्यत्वाला सहकार मंत्र्यांनी मंजुरीदिल्याने जिल्हा बँकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटातील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. या निर्णयामुळे बँकेच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, आगामी काळात अनेक मोठया राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. विरोधी गटातील 1132 सभासदांना मंजुरी मिळाल्याने सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आ. प्रवीण तायडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. आ. तायडे यांनी आपणच विरोधी गटातील सभासदांना मंजुरी मिळवून दिल्याचा दावा केला आहे. दरम्यान, सहकार मंत्र्यांच्या या निर्णयाला सत्ताधारी गटाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याचिकेवर येत्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता असल्याने आता सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.
हायकोर्टात आव्हान; पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता
सहकार मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता असल्याची माहिती सत्ताधारी गटाकडून देण्यात आली आहे. 1132 सभासदांच्या सदस्यत्वाचा अंतिम निर्णय न्यायालयाच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकीय समीकरणांवरही या निर्णयाचा मोठा परिणाम होऊ शकतो.
आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे बदलणार?
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आतापासूनच विविध राजकीय गट सक्रिय झाले आहेत. 1132 सभासदांना मिळालेली मंजुरी, त्याविरोधात दाखल झालेली न्यायालयीन याचिका आणि त्यातून निर्माण झालेला राजकीय संघर्ष यामुळे निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले आहे. आ.प्रवीण तायडे आणि आ.बच्चू कडू यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे या संघर्षाला राजकीय रंग चढला आहे. आगामी काळात दोन्ही गटांकडून आणखी आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. आता या संपूर्ण वादात उच्च न्यायालय काय भूमिका घेते, याकडे अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आ. बच्चू कडूंचा पलटवार; तायडेंच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आ.बच्चू कडू यांनी प्रवीण तायडे यांच्या दाव्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नवीन 1132 सभासदांपैकी एकही सभासद भाजपचा नसल्याचा दावा आ.बच्चू कडू यांनी केला. उलट काँग्रेसशी संबंधित सभासदांची सदस्यता मंजूर करण्यासाठी भाजपचे आमदार पुढाकार का घेत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.प्रवीण तायडे यांची स्वतःची सदस्यताही नामंजूर करण्यात आली होती. त्यामुळे ते कोणत्या आधारावर 1132 सभासदांच्या मंजुरीचे श्रेय घेत आहेत?’ असा सवाल बच्चू कडू यांनी केला. सहकार मंत्र्यांनीच यापूर्वी तायडेंची सदस्यता रद्द केली होती आणि आता त्यांच्याच माध्यमातून काँग्रेसच्या सभासदांची सदस्यता वाचविण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा टोलाही कडू यांनी लगावला.

आ. प्रविण तायडेंचा दावा, ‘1132 मते आपणच मंजूर करून आणली’
भाजपचे अचलपूरचे आ. प्रवीण तायडे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रस असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बँकेत स्वार्थी लोकांना बाजूला करून प्रामाणिक लोकांना संधी देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आ. प्रविण तायडे यांनी असा दावा केला की, ‘1132 मते आपणच मंजूर करून आणली आहेत,’ आगामी काळात जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढविण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. जिल्हा बँकेत भ्रष्टाचाराला आळा घालून शेतकर्‍यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक लोकांची गरज असल्याचेही तायडे यांनी म्हटले. आ. रवि राणा आणि इतर नेत्यांसोबत पॅनेल करून निवडणूक लढण्याची शक्यताही त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त झाली आहे.

1132 सभासदांचा नेमका वाद काय?
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील वर्चस्वासाठी सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये गेल्या काही काळापासून संघर्ष सुरू आहे. बँकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी सत्ताधारी गटाने नवीन सभासदांची संख्या वाढविल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर विरोधी गटानेही आपल्या 1132 सभासदांच्या सदस्यत्वाला मंजुरी देण्याची मागणी केली. प्रथम बँक प्रशासन आणि त्यानंतर संबंधित सहकार विभागीय यंत्रणेकडून या सभासदांच्या सदस्यत्वाला विरोध करण्यात आला. मात्र, विरोधी गटाने सहकार मंत्र्यांकडे धाव घेतली. सुनावणीनंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 1132 सभासदांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद म्हणून मान्यता दिल्याचे सांगण्यात येते.

संबंधित बातम्या

Back to top button