महापौर तेजवानी यांचा शहराचा कायापालट करण्याचा निर्धार

विकासासाठी सव्वा वर्षाचा प्रत्येक क्षण वेचणार

मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेला देणार प्राधान्य

अमरावती / 6 फेब्रुवारी – अमरावती शहराला प्रगत, आधुनिक आणि सोयीसुविधांनी सज्ज महानगर बनवण्यासाठी नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवानी यांनी कंबर कसली आहे. आपल्या सव्वा वर्षाच्या कार्यकाळातील प्रत्येक क्षण जनहितासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करण्याचा ठाम संकल्प त्यांनी दैनिक ‘आपली मातृभूमी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.
नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवानी यांनी पदभार स्वीकारताच शहराच्या विकासाचा कृती आराखडा मांडला. अमरावती हे वेगाने विस्तारणारे शहर असून वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेऊन शुद्ध पेयजल, अखंड वीजपुरवठा, दर्जेदार रस्ते, सांडपाण्याची उत्तम व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन यावर त्यांचा विशेष भर असेल. शहराला स्वच्छतेत राज्यात आघाडीवर नेण्यासाठी सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवणे आणि नागरिकांच्या सहभागातून ’सुंदर अमरावती’ घडवणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे.
शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांना विकासाचा कणा मानत, महापालिकेच्या शाळा आणि रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी ते विशेष प्रयत्न करणार आहेत. वाढत्या वाहतुकीच्या कोंडीवर मात करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मदतीने पार्किंग आणि वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी केली जाईल. तसेच, महापालिकेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना घरबसल्या सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री आणि सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीला नागपूरच्या अंबाझरीप्रमाणे देखणे बनवण्याचे स्वप्न त्यांनी यावेळेस बोलून दाखवले. श्रीचंद तेजवानी यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. इयत्ता तिसरीत असताना वडिलांचे छत्र हरपल्यानंतर काकांनी त्यांचा सांभाळ केला. आर्थिक ओढाताणीमुळे अकरावीतच शिक्षण सोडावे लागले. किराणा दुकान, व्हीसीआर कॅसेट आणि केबल व्यवसायातून त्यांनी प्रगती साधली. 2017 मध्ये ’बढते कदम’ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जनसेवेचा वारसा जपत त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि आज ते शहराच्या प्रथम नागरिक पदापर्यंत पोहोचले आहेत.

लोकसहभागातून विकास साधणार शहराचा विकास केवळ प्रशासनाच्या भरवशावर शक्य नाही, त्यासाठी अमरावतीकरांची साथ मोलाची आहे. भाजपची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत असल्याने निधीची कमतरता भासणार नाही. युवक, महिला सक्षमीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष योजना राबवून अमरावतीला आदर्श महानगर बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button