जेवडच्या शाळेचा होणार कायापालट
राणांच्या प्रयत्नांतून भव्य इमारत साकारणार

* दर्जेदार शिक्षणाची नवी पहाट उगवली
अमरावती /22 मार्च : शासकीय शिक्षण संस्थांचा दर्जा सुधारून गोरगरिबांच्या लेकरांना उत्तम सोयीसुविधा मिळाव्यात, या ध्येयाने आ. रवी राणा यांच्या पुढाकाराने जेवड येथील महानगरपालिका उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नूतन इमारतीचे काम हाती घेण्यात आले आहे. आधुनिक आणि सर्व सोयींनी युक्त अशा या वास्तूचा भूमिपूजन सोहळा आमदार रवी राणा व खा. अनिल बोंडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला.
आमदार रवी राणा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जेवडच्या या शाळेला आता नवे आणि देखणे रूप प्राप्त होणार आहे. या मंगलप्रसंगी महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, मुख्याध्यापक प्रशांत नालसे, नगरसेविका सुमतीताई ढोके, शारदा मंगेश खोंडे व राजेंद्र तायडे यांच्यासह शालेय कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. ही नवी इमारत म्हणजे केवळ सिमेंट-विटांचे बांधकाम नसून, आपल्या भागातील मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया ठरेल, असा विश्वास या वेळी मान्यवरांनी व्यक्त केला. गावातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आता खासगी शाळांप्रमाणेच सर्व सुविधा आपल्या हक्काच्या शाळेत मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.




