13 वर्षीय विराटचा मृतदेह दोन दिवसांनंतर पाण्यावर तरंगताना आढळला
विराटच्या मृत्यूचे गूढ वाढले; घातपाताची शंका

* मित्रांनी लपविले सत्य कुटुंबीयांचा गंभीर आरोप
* धारणी तालुक्यात खळबळ; पोलीस तपास सुरू
धारणी /22 मार्च : येथील लंगडा बाबा देवस्थान परिसरातील गवलानडोह सिंचन तलावात गुरुवारी बुडालेल्या 13 वर्षीय विराट भवसिंग बडोदे या चिमुरड्याचा मृतदेह दोन दिवसांनंतर शनिवारी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळला. या घटनेमुळे संपूर्ण सादराबाडी गावावर शोककळा पसरली असून, विराटचा मृत्यू हा केवळ अपघात नसून त्यामागे काहीतरी काळं-बेरं असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मुलाच्या वडिलांनी या प्रकरणी घातपाताचा आरोप केल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी विराट घरच्यांना काहीही न सांगता आपल्या काही अल्पवयीन मित्रांसोबत गवलानडोह तलावावर पोहण्यासाठी गेला होता. पोहताना ’कोण जास्त लांब जातो’ अशी पैज मित्रांमध्ये लागली आणि याच नादात विराट खोल पाण्यात शिरला. तलावातील गाळ आणि दलदलीचा अंदाज न आल्याने तो तिथेच अडकला आणि मदतीसाठी कोणीही पुढे न आल्याने गुदमरून त्याचा अंत झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही दुर्घटना घडल्यानंतर घाबरलेल्या मित्रांनी बराच वेळ ही माहिती कोणालाही दिली नाही. सायंकाळी उशिरा पर्यंत विराट घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली, तेव्हा मित्रांनी सत्य वदले आणि गावात एकच खळबळ उडाली.
तलावा काठी विराटचे कपडे आणि चपला मिळून आल्याने भीती अधिकच गडद झाली. घटनेची माहिती मिळताच धारणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अमरावती येथील बचाव पथकाला पाचारण करून शुक्रवारी दिवसभर शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र यश आले नाही. अखेर शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह उथळ पाण्यात तरंगताना दिसला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदन करून सादराबाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मित्रांनी ही बाब का लपवून ठेवली आणि तलावाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, असे अनेक प्रश्न आता अनुत्तरित आहेत.
पित्याचा टाहो : माझ्या मुलाला न्याय द्या!
विराटचे वडील भवसिंग बडोदे यांनी आपल्या मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा केला आहे. माझ्या मुलासोबत जे मित्र गेले होते, त्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाला दिली आहे. या संवेदनशील घटनेमुळे संपूर्ण धारणी पोलीस दलाचे लक्ष आता तपासाकडे लागले आहे.




