ताजनगरात दोन ठिकाणी कोसळली वीज

मशीदीची मिनार क्षतीग्रस्त

-पंखे, लाईटही जळाले
अमरावती / 28 मे: अमरावती शहरात मंगळवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले होते. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाउस बरसला. अशातच शहरातील ताजनगर भागात दोन ठिकाणी वीज कोसळल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका मशिदीच्या मिनारवर आणि एका घरावर ही वीज कोसळली. त्यात मिनारचा काही भाग क्षतीग्रस्त झाला तर घरातील पंखे, लाईट जळाल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नाही.
मंगळवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत अमरावती शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. विजेच्या प्रचंड कडकडाटामुळे नागरिक भयभितही झाले होते. अशातच शहराच्या पश्चिम भागात असलेल्या ताज नगर नं. 2 येथील मशिदीच्या मिनारवर रात्री वीज कोसळली. त्यात मिनार क्षतीग्रस्त झाली. त्यासोबतच मशिदीच्या परिसरातील काही दुकाने व घरांतील लाईट आणि पंखे मोठ्ठा आवाज होवून जळाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर काही वेळातच याच परिसरातील एका घराच्या छतावर वीज कोसळली. त्यामुळे या घराच्या वरील भागाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. तसेच घरातील लाईट आणि पंखे व अन्य उपकरणही बंद पडलेत. घटनेनंतर या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित बातम्या

Back to top button