कडक उन्हाऐवजी मे महिन्यातच पावसाने धरलाय जोर
घामघुम होण्याऐवजी ओलेचिंब होण्याची वेळ

चांदूरबाजार /25 मे: ऋतूचक्रानुसार दरवेळी मे महिन्यात आपणास कडक ऊन पाहायला मिळते. परंतु यंदा मे महिन्याच्या मध्यालाच पावसाने सुरुवात केली असल्याने ऐन उन्हाळ्यातच पावसाळ्याचा आनंद मिळत आहे. मे मधील कडक उन्हाऐवजी पावसानेच आता जोर धरलेला आहे.
अलीकडे ऋतुचक्र बदलत चालले असल्याचे आपणास पाहायला मिळत आहे. कधी कधी पाऊस तर बारा महिने कोणत्याही ऋतूत पडत असून ऋतुचक्र चुकले की काय याचा भास होत आहे. उन्हाळ्याची चाहूल फेब्रुवारीमध्येच लागलेली असते. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये उन्हाळा ऋतू असून जूनमध्ये पावसाळ्याला सुरुवात होते. परंतु दिवसेंदिवस हे ऋतुचक्र बदललेले पाहायला मिळत आहे. साधारण उन्हाळ्याच्या एप्रिल, मे मध्ये कडक ऊन आपणास अनुभवायला मिळते. या कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे जो तो थंडावा शोधण्याचा प्रयत्न करत असतो. घरामध्ये पंखे, कुलर, ए.सी याचा वापर आपल्या परिस्थितीनुसार केलेला पाहायला मिळतो.
यंदा मे महिन्याच्या मध्यान्हीलाच पावसाने महाराष्ट्रात सुरुवात केली असून, जिकडे तिकडे हिरवेगार असे गवताचे गालीचे तयार होत असल्याचे चित्र दिसत आहेत. वातावरणामध्ये कमालीचा बदल होऊन थंडावा निर्माण होत आहे. यंदा आंबे खाण्यासाठी मनोसक्त मिळालेले नसून पावसाच्या या लगबगी मुळे या आंब्यापासून आता वंचित राहावे लागणार आहे. एकंदरीतच या ऋतुचक्राने स्वतःमध्ये बदल केला असून पावसाने तर ऐन उन्हाळ्यातच कहर केलेला पाहायला मिळत आहे. मे मध्ये कोरडे पडलेली तळी पाण्याने भरू लागली असून ओढे, नाले वाहू लागले आहेत.
यंदा उन्हाळा अतिशय कडक होता. उन्हामुळे उकाडा जास्त होता. यामुळे या उन्हाचा जास्त त्रास व्हायचा. शेतातील कामे सकाळी उन्हापुर्वीच उरकावी लागायची. मजूर शेतातील कामाला उन्हामुळे येत नसायचे. अचानक मे महिन्यातील कडक उन्हातच पाऊस सुरु झाल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला असून आंबा बागायतदारांना तसेच इतर शेतकर्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे.
पावसाचे अनेक प्रकार
रिमझिम, मुसळधार पाऊस, संततधार पाऊस, गारांचा पाऊस, अतिवृष्टी, हिमवर्षाव, हिमवादळ, हलका पाऊस, तुरळक पाऊस, विखुरलेला पाऊस, थांबून थांबून पडणारा पाऊस, सार्वत्रिक पाऊस, मेघगर्जनेसहित पाऊस, वादळी पाऊस, मोसमी पाऊस, नैऋत्य मोसमी पाऊस, ईशान्य मोसमी पाऊस किंवा हस्ताचा पाऊस, अवकाळी पाऊस, कृत्रिम पाऊस असे पावसाचे अनेकविध प्रकार आहेत.