‘गांधीगिरी’ नाही, आता ‘भगतसिंगगिरी’चा हिसका दाखविणार
बच्चू कडूंचा इशारा, सरकारवर ‘प्रहार’

-शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्यभरात ‘चक्काजाम’
-हजारो शेतकर्यांचा आंदोलनात सहभाग
अमरावती / 24 जुलै: शेतकर्यांच्या भरवशावर सत्तेत आल्यानंतरही त्यांच्या प्रश्नांची सरकारला पर्वा नाही. शेतकर्यांना कर्जमाफी द्या, अशी मागणी आम्ही सातत्याने करतो आहोत. शेतकर्यांच्या हक्कासाठी आतापर्यंत शांततेने आंदोलनं केलीत. मात्र सरकारला जाग आली नाही. आता आम्ही ‘गांधीगिरी’ सोडणार आहोत. सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी ‘भगतसिंगगिरी’चा अवलंब करुन आक्रमक आंदोलनातून हिसका दाखविला जाईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला.
राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी, यासह अन्य मागण्यासाठी आज गुरुवारी राज्यभर प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अचलपूर येथे चक्काजाम आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असून त्यांना शेतकर्यांच्या प्रश्नांशी काहीच देणेघेणे नसल्याचा आरोप केला. तीव्र शब्दात बच्चू कडू यांनी सरकारच्या शेतकर्यांप्रती असलेल्या अनास्थेवर ‘प्रहार’ केला.
राज्यात सर्वत्र पीक चांगलं होतंय. नापिकी होईल अशी परिस्थिती नाही. यामुळं शेतकर्यांना कर्जमाफीची गरज नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. आम्हीही म्हणतो पिकं चांगलीच होती, आमचा शेतकरी कष्टातून धान्य पिकवतो. मात्र त्यांच्या शेतमालाला भाव कुठे आहेत. दर्जेदार ज्वारीला 3300 रुपये भाव अपेक्षित असताना केवळ 1500 रुपये मिळत आहे. अर्ध्या किमतीत माल विकावा लागला तर तो जगेल कसा, असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला. शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकर्यांना कर्जमाफी हवी आहे. सातबारा कोरा करु असं मुख्यमंत्री स्वतः बोलले होते. त्यांनी आपल्या शब्दाला जागावं, असं बच्चू कडू म्हणाले.
नागपूरमध्ये आज आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. नागपूरच्या भाजपा कार्यालयात बसून पोलीस अधीक्षकानं हे काम केलंय. आम्ही आता नागपूरला स्पेशल चक्काजाम आंदोलन करणार, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिलाय. राज्याचे कृषी मंत्री सभागृहात मोबाईलमध्ये जंगली रमी खेळतात. भारतरत्न असा सन्मान मिळवणारा सचिन तेंडुलकर जंगली रमीची जाहिरात करतो. हे सर्व या सरकारला चालतं आणि ग्रामीण भागात आमचा शेतकरी पत्ते खेळताना दिसला की, त्याच्यावर कारवाई होते. हे चुकीचं आहे, असं देखील बच्चू कडू म्हणाले.
आज राज्यभर बच्चू कडूंच्या आवाहनावरुन प्रहार कार्यकर्ते आणि शेतकर्यांनी रास्तारोको आंदोलन केले. हजारो शेतकरी या आंदोलनात उतरले होते. मुंबई-अहमदाबाद हायवेवर बच्चू कडू यांच्या समर्थकांनी चक्काजाम केला. नाशिक येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यात नेर येथे आंदोलकांनी रस्ता अडवला. तर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे गोंदिया जिल्ह्यात तिरोडा ते तुमसर राष्ट्रीय महामार्गावर विरसी येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. याशिवाय, राज्यात एकूण तीनशे ठिकाणी चक्काजाम आंदोलन शेतकरी करत आहेत, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
-तारिख न सांगता मंत्रालयात शिरणार!
आम्ही गुरुकुंज मोझारी येथे अन्नत्याग आंदोलन केलं तेव्हा शेतकर्यांना कर्जमाफी दिली जाईल, असं आश्वासन या सरकारनं दिलं होतं. त्यानंतर अद्यापही कर्जमाफी केव्हा देणार याची तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मग आम्ही सुद्धा आता तारीख जाहीर न करता थेट मंत्रालयात शिरू आणि तिथं आंदोलन करू. शेतकरी, मच्छिमार, मेंढपाळ, दिव्यांग बांधव असे सर्व त्या आंदोलनात असतील, अशी घोषणा करुन बच्चू कडू यांनी यावेळी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.




