अनिल अग्रवाल यांच्या इशार्‍यामुळे रेल्वे प्रशासन ‘ट्रॅक’वर

चांगापूरचा रेल्वे अंडरपास चुकीचाच, प्रशासनावर प्रहार

* तर..सुरक्षा भिंत तोडण्याचा हनुमान भक्तांचा इशारा

अमरावती /27 मार्च – अमरावती जवळील चांगापूर फाट्याकडून चांगापूर नरेश हनुमान मंदिराकडे जाणार्‍या मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर मध्य रेल्वेने बांधलेला ’अजब’ आणि तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचा अंडरपास आता रेल्वे प्रशासनाच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. या गंभीर समस्येवर अमरावती महानगर पालिकेचे स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी रेल्वे प्रशासनाला आगामी 2 एप्रिल रोजी असलेल्या हनुमान जन्मोत्सवापूर्वी अंडरपासवर ठोस तोडगा न निघाल्यास गंभीर परिणाम होतील, हा खणखणीत इशारा दिल्यानंतर रेल्वेच्या अभियंता आणि अधिकार्‍यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आज राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे आणि रेल्वेचे वरिष्ठ अभियंता राणे व वासेकर यांनी तातडीने आज चांगापूर रेल्वे क्रॉसिंग आणि अंडरपासची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपस्थित चांगापूरवासीयांचा संताप अनावर झाला होता. नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांसमोर नकाशा ठेवून या कामातील तांत्रिक चुकांचा पाढाच वाचला. रेल्वे क्रॉसिंगच्या एका बाजूकडून दुसर्‍या बाजूचे अंतर केवळ 50 फूट असताना, रेल्वेने तब्बल 500 मीटर लांब आणि अत्यंत वळणदार अंडरपास बांधून प्रवाशांची मोठी गैरसोय केली आहे. या मार्गावर दोन वाहने समोरासमोर आल्यास भीषण अपघाताची शक्यता असून, पावसाळ्यात येथे पाणी साचल्यास हा एकमेव मार्गही पूर्णपणे बंद होईल, अशी भीती अग्रवाल यांनी व्यक्त केली.
हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चांगापूर नरेश हनुमान मंदिरात 5 ते 7 लाख भाविक दर्शनासाठी येतात. एवढ्या मोठ्या संख्येने येणारी वाहने आणि भाविक या अरुंद व अंधार्‍या अंडरपासमधून जाणे अशक्य आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत रेल्वे क्रॉसिंगचा रस्ता पूर्वीप्रमाणेच समतल करून तो भाविकांसाठी खुला करावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. पाहणी दरम्यान खासदार डॉ. अनिल बोंडे आणि अनिल अग्रवाल यांनी रेल्वेच्या वरिष्ठ उपमहा व्यवस्थापकांशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करून वस्तुस्थिती मांडली. जर 31 मार्चपर्यंत रस्ता मोकळा केला नाही, तर चांगापूरवासीय स्वतः आंदोलनाच्या पवित्र्यात रेल्वेने बांधलेली सुरक्षा भिंत तोडून रस्ता तयार करतील आणि रस्ता पूर्ववत करतील. गरज पडल्यास ’रेल रोको’ आंदोलनही केले जाईल, असा सज्जड दमही यावेळी देण्यात आला. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून रेल्वे क्रॉसिंगवर थेट ओव्हरब्रिज बांधावा किंवा सध्याच्या अंडरपासला ’वन-वे’ करून दुसर्‍या बाजूला आणखी एक अंडरपास निर्माण करावा, असे पर्याय प्रशासनासमोर ठेवण्यात आले आहेत. तसेच तातडीने या भागात प्रकाश व्यवस्था करणे, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आणि बांधकामासाठी साचलेली खडी-माती हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेल्वे अधिकार्‍यांनी आणि कंत्राटदाराने अंडरपास बांधकामाच्या निर्देशाचे उल्लंघन करून मनमानी कारभार केल्याचे सांगत अनिल अग्रवाल यांनी रेल्वे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या पाहणी प्रसंगी चांगापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, हनुमान भक्तांनी रेल्वेच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.गेल्या तीन महिन्यांपासून चांगापूरचे रहिवासी आणि हनुमान भक्त रेल्वे अंडरपासच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. चांगापूरच्या आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांना गावात येण्यासाठी केवळ रेल्वे अंडरपासचाच मार्ग उपलब्ध आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने हा अंडरपास तयार करताना सामान्य जनता आणि जड वाहनांच्या येण्या-जाण्याचा कोणताही तांत्रिक विचार केला नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी केल्या आणि लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली, तरीही प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. अखेर, हनुमान भक्तांनी महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल यांची भेट घेऊन, प्रत्यक्ष भगवंताच्या दर्शनासाठी येताना होणार्‍या त्रासाची सविस्तर माहिती दिली.
नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी तातडीने चांगापूरला भेट देऊन ’चांगापूर नरेश’ हनुमानाचे दर्शन घेतले. सामान्य नागरिक, शेतकरी आणि हनुमान भक्तांना होणारा त्रास प्रत्यक्ष पाहिल्यावर, रेल्वे प्रशासनाने कोणत्या तार्किक आणि तांत्रिक ज्ञानाच्या आधारे या अंडरपासची निर्मिती केली? असा सवाल अग्रवाल यांनी उपस्थित केला. त्यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून हा प्रश्न कायमचा सुटेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार केला.
शुक्रवारी, दि. 27 मार्च रोजी खासदार अनिल बोंडे यांच्यासह अनिल अग्रवाल यांनी पुन्हा एकदा घटनास्थळाची पाहणी केली आणि हा प्रश्न तडीस नेण्याचा निर्णय घेतला. रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्‍यांशी चर्चा झाली असली, तरीही पुढील आठवड्यात येणार्‍या हनुमान जयंती उत्सवासाठी भक्तांना होणारा त्रास प्रशासनाच्या लक्षात येत नाही. यावर अग्रवाल यांनी संताप व्यक्त केला. मी स्वतः हनुमान भक्त असल्याने मला या त्रासाची जाणीव आहे. रेल्वे प्रशासनाने अंडरपासबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील परिणामांना तयार राहावे, अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले.

मी स्वत: सुरक्षा भिंत फोडेन

प्रशासनाने जनतेच्या हितासाठी काम करायचे असते. मात्र, रेल्वे प्रशासन अजूनही इंग्रजांच्या काळातील असल्यासारखे वागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नागरिक आणि शेतकरी त्रस्त असताना प्रशासन झोपले आहे का? 31 मार्चपर्यंत हा प्रश्न सुटला नाही, तर हनुमान भक्तांच्या सोयीसाठी मी स्वतः कुदळ मारून ती सुरक्षा भिंत फोडेन. मुजोर अधिकार्‍यांचे डोळे उघडण्यासाठी दुसरा मार्ग उरत नाही. काही अघटित घडल्यास त्याची सर्व जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल. – अनिल अग्रवाल, स्वीकृत नगरसेवक.

संबंधित बातम्या

Back to top button