भरधाव कारला अपघात दोघांचा मृत्यू
मुर्तीजापूर-कारंजा मार्गावर दुर्घटना

* अपघातात चार गंभीर जखमी
मुर्तीजापूर / 5 जानेवारी : कारंजा- मुर्तीजापूर मार्गावरील उमरी अरब शिवारात गुरुवारी सायंकाळी मृत्यूने भीषण तांडव घातले. भरधाव वेगाने जाणार्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट शेतात कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच करुण अंत झाला, तर चार जण रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कारंजा शहरावर शोककळा पसरली असून महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास एमएच 36- झेड-0909 क्रमांकाची चारचाकी गाडी मुर्तीजापूरवरून कारंजा लाडच्या दिशेने सुसाट वेगाने जात होती. उमरी अरब गावाजवळ येताच अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही अनियंत्रित कार रस्त्यावरून थेट शेतात जाऊन कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात रोहित भगवानदास रील (वय 25, राहणार वाल्मिकी नगर, कारंजा) आणि संकेत राजेश मेश्राम (वय 25, राहणार गवळीपुरा, कारंजा) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता कारमध्ये तरुणांचा रक्ताचा सडा पडलेला पाहायला मिळाला. या भीषण अपघातात यशवंत घनश्याम राठोड (वय 31, राहणार कारंजा), अक्षय संजय रोकडे (वय 27, राहणार दातगांव, तालुका कारंजा), ओम दिपक मुंदे (वय 19, राहणार कारंजा) आणि आर्यन अमोल अंभोरे (वय 19, राहणार कारंजा) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मुर्तीजापूर येथील आपत्कालीन पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढले आणि उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक कानडे, पोलीस कर्मचारी शंकर खेडकर, गणेश ठाकरे, गजानन सयाम आणि रामहरी केंद्रे हे करत आहेत. अतिवेगामुळेच चालकाचा ताबा सुटून हा जीवघेणा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.




