आंतरजिल्हा मोबाईल टोळी उद्ध्वस्त
गाडगेनगर पोलिसांचा थरारक ’स्पेशल-26’ स्टाईल दणका

* मोबाईल हिसकावणारी टोळी गजाआड, नऊ संच जप्त
* तीन विधी संघर्षित बालकांकडून दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अमरावती/15 फेब्रुवारी : शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांवर दुचाकीवरून येऊन क्षणात मोबाईल लांबवणार्या एका अट्टल टोळीचा गाडगेनगर पोलिसांनी अत्यंत थरारक पाठलाग करून पर्दाफाश केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या अचूक रणनीतीमुळे या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून 2 लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये नामांकित कंपन्यांचे 9 महागडे स्मार्टफोन आणि गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकींचा समावेश आहे. या गुन्ह्याची सविस्तर हकीकत अशी की, फिर्यादी जान्हवी शंकर तायडे (21, रा. राधाकृष्ण नगरी, कौलखेड, अकोला, ह.मु. अर्जुन नगर, अमरावती) या 13 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4.45 च्या सुमारास अशोक कॉलनीतील हनुमान मंदिराजवळून पायी घरी जात होत्या. यावेळी एका काळ्या रंगाच्या स्प्लेंडर दुचाकीवर दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी अतिशय वेगाने येऊन जान्हवी यांच्या हातातील साडेचार हजार रुपये किमतीचा ’रियलमी’ कंपनीचा मोबाईल हिसकावला आणि क्षणात पसार झाले. या घटनेची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला (डी.बी. पथक) तपासाचे आदेश दिले. अतुल वर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस हवालदार भारत वानखडे आणि त्यांच्या सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील नागरिकांशी चर्चा केली. तांत्रिक पुरावे आणि खबर्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिसांनी संशयावरून दोन विधी संघर्षित बालकांना त्यांच्या पालकांसमोर विश्वासात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणार्या या बालकांनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी आपल्या तिसर्या साथीदाराच्या मदतीने शहरात विविध ठिकाणी मोबाईल हिसकावल्याचे मान्य केले.
पोलिसांनी या बालकांकडून सॅमसंग गॅलेक्सी, वन प्लस, विवो, रेडमी, एच.एम.डी. आणि ओप्पो अशा नामांकित कंपन्यांचे नऊ मोबाईल संच जप्त केले आहेत. तसेच, चोरीसाठी वापरलेली स्प्लेंडर (क्रमांक चक27/ऊच्-0836) आणि पॅशन (क्रमांक चक32/-ॠ-8811) या दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे अमरावतीतील मोबाईल चोरांचे धाबे दणाणले आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजया पंधरे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) समाधान वाठोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या यशस्वी मोहिमेत डी.बी. पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज मानकर, पोलीस हवालदार भारत वानखडे, पोलीस नाईक राजेश गुरेले, पोलीस शिपाई मतिन शेख, सुशांत प्रधान, महेश शर्मा, रुपेश हटकर आणि नंदकिशोर करोची यांनी मोलाची भूमिका बजावली.
अतुल वर यांचा ’क्राईम मास्टर’ प्लॅन-वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर यांनी गुन्ह्याचा तांत्रिक अभ्यास करून पथकाला अचूक दिशा दिली. गुन्हेगारांच्या वावरण्याच्या पद्धतीवरून त्यांनी ही टोळी अल्पवयीन मुलांची असू शकते, असा संशय व्यक्त केला होता, जो तपासात तंतोतंत खरा ठरला. त्यांच्या या सूक्ष्म नियोजनामुळे अवघ्या 24 तासांत या टोळीचा छडा लागला असून नागरिकांनी पोलिसांच्या या तत्परतेचे स्वागत केले आहे.




