मध्यवर्ती कारागृहात नागपूरच्या गुंडांनी घातला गोंधळ
वरिष्ठ अधिकार्यांच्या अंगावर धाउन गेल्याने खळबळ

* फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती /2 फेब्रुवारी – स्थानिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कुख्यात गुंडाने सुरक्षा यंत्रणेलाच आव्हान देत वरिष्ठ अधिकार्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. नागपूरचा रहिवासी असलेला नितीश उर्फ सूर्या उर्फ सोनू अनिल जयस्वाल याने शोध मोहिमेदरम्यान कमालीची अरेरावी करत कारागृह प्रशासनावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, या मुजोर कैद्याच्या वागणुकीमुळे केवळ अधिकारीच नव्हे, तर इतर बंदीवानही प्रचंड संतापले आहेत. या गंभीर प्रकारानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात या गुंडाविरुद्ध अधिकृत तक्रार नोंदवली आहे.
30 जानेवारीच्या सायंकाळी (नियमित) तपासणी सुरू असताना हा सर्व प्रकार घडला. अतिरिक्त अधीक्षक विकास भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली जवान ईश्वर डहाणे आणि त्यांचे सहकारी बराक क्रमांक 6 मधील साहित्याची पाहणी करत होते. यावेळी सूर्या जयस्वाल याच्याकडील अनावश्यक साहित्य जप्त करण्याच्या सूचना देताच त्याने रौद्र रूप धारण केले. त्याने वरिष्ठ अधिकारी देवराव जाधव यांच्याशी हुज्जत घालत मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्याची आणि सर्वांना न्यायालयात खेचण्याची धमकी दिली. यापूर्वी नागपूर कारागृहातही असाच धिंगाणा घातल्याने त्याची अमरावतीला बदली करण्यात आली होती, मात्र तेथेही त्याने आपली गुंडगिरी कायम ठेवली आहे. अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला हा आरोपी आता कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात अडकला आहे.
सहकारी बंदीवानांमध्ये संतापाची लाट
नितीश जयस्वाल याच्या सततच्या हिंसक वर्तणुकीमुळे आणि उद्दामपणामुळे कारागृहातील शांतता धोक्यात आली आहे. त्याच्या दहशतीला कंटाळून बराक क्रमांक 6 मधील इतर कैदीही कमालीचे त्रस्त झाले असून, या गुंड प्रवृत्तीचा परिणाम संपूर्ण शिस्तीवर होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.




