विरोधकांनी प्रश्न मांडणे म्हणजे बदनामी नव्हे

माजी आ.यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

अमरावती/9 जुलै– महाराष्ट्र हा 14 कोटी जनतेचा स्वाभिमानी प्रदेश आहे. रस्ते, भ्रष्टाचार, विकासातील उणिवा किंवा जनतेचे प्रश्न मांडणे ही विरोधी पक्षाची घटनात्मक भूमिका आहे. विरोधकांनी जनहिताचे प्रश्न मांडणे म्हणजे मुख्यमंत्र्यांची किंवा महाराष्ट्राची बदनामी नव्हे. मुख्यमंत्र्यांनी टीका वैयक्तिक न घेता जनतेच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे म्हणत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषेचा समाचार घेताना म्हटले की, ज्यांनी आयुष्यभर भाडोत्री लोक वापरून दुस-यांवर टीका केली, त्यांना आज स्वत:वर होणारी उत्स्फूर्त टीकाही भाडोत्री वाटते. लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही नुकतेच सरकारला फटकारले आहे. मोठ्या पदावर बसलेल्या नेत्यांनी जनतेच्या टीकेला खिलाडूवृत्तीने घेऊन कामात सुधारणा करायची असते. विधान भवनातून अशा धमक्या द्यायच्या नसतात. बॉडी लँग्वेज सांगत आहे, मिसिंग लिंकचा दणका जोरात बसलाय! हे ‘बिनकामाचं सरकार’ म्हणजे महाराष्ट्र नाही आणि फडणवीस म्हणजे महाराष्ट्र तर अजिबातच नाही, असा टोला ठाकूर यांनी लगावला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संविधानात्मक चौकटीची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला.पावसाळी अधिवेशनात पुणे-मुंबईएक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंकला पडलेले खड्डे आणि पावसातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून भाडे के टट्टू’, ‘देख लुंगा..’ अशा शब्दांत धमकीवजा इशारा दिला होता. फडणवीस यांच्या या टीकेवरून विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button