अमरावतीच्या शकुंतला रेल्वेला विधानसभेत नवी संजीवनी
50 टक्के खर्च करण्यास राज्याची तयारी

बच्चू कडूंच्या पाठपुराव्याला शासनाची दाद
अमरावती/9 जुलै – विदर्भाच्या जीवनवाहिनी मानल्या जाणार्या शकुंतला रेल्वेमार्गाच्या पुनरुज्जीवनाला अखेर नवी आशा मिळाली आहे. आ. बच्चू कडू यांनी विधानसभेत हा प्रश्न ठामपणे मांडल्यानंतर राज्य शासनाने या रेल्वे प्रकल्पासाठी एकूण
खर्चातील 50 टक्के हिस्सा उचलण्याची तयारी आहे. तब्बल 3,387 कोटींच्या या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्र
शासनाशी समन्वय साधून आवश्यक पावले उचलण्याचे ओशासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्याने अमरावती
जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या शकुंतला रेल्वेच्या पुनर्प्रारंभाच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत. मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आ. बच्चू कडू यांनी विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाच्या शकुंतला रेल्वेमार्गाचा प्रश्न जोरदारपणे उपस्थित केला. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या या रेल्वेमार्गामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आ. बच्चू कडू यांनी सांगितले की, हा रेल्वेमार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र शासनाच्या पातळीवर अनेक बैठका झाल्या. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्ष कामाला गती मिळाली नाही. त्यामुळे हा प्रश्न आता अधिक काळ प्रलंबित ठेवणे योग्य नसून तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शकुंतला रेल्वे प्रकल्पाची अंदाजित किंमत 3,387 कोटी असल्याची माहिती दिली. या प्रकल्पातील 50 टक्के खर्च उचलण्यास महाराष्ट्र शासन तयार असून उर्वरित निधीसाठी केंद्र शासनाशी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भातील लाखो नागरिकांसाठी हा रेल्वेमार्ग केवळ प्रवासाचे साधन नसून व्यापार, शिक्षण, शेतीमालाची वाहतूक आणि ग्रामीण भागाच्या विकासाचा आधार असल्याचे मतही सभागृहात व्यक्त करण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळवून काम सुरू करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ओशासन देण्यात आले.शकुंतला रेल्वेमार्गाच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न पुन्हा एकदा विधानसभेत ठळकपणे मांडला गेल्याने विदर्भातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या या रेल्वेची शिट्टी पुन्हा घुमावी, अशी भावना आता सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.




