झिपरकर कुटुंबाचा पोलीस स्टेशनमध्ये अंगावर डिझल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न
पोलिसांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ

दर्यापूर /27 मार्च –दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील नालावडा येथील झिपरकर परिवार यांनी काही दिवसापूर्वी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज शुक्रवार रोजी संजय झिपरकर व सारिका झिपरकर यांनी दर्यापूर पोलीस स्टेशन येथे अचानक येत अंगावर डिझेल टाकून पेटून घेण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने दर्यापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. 13 मे 2025 रोजी खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील नालवाडा येथील झिपरकर परिवार व बोडखे परिवार यांच्यामध्ये जागेच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला होता यात रामभाऊ झिपरकर वय 85 वर्षीय इसमाला वादात डोक्यावर वीट लागल्याने सदर वृद्ध इसमाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर खल्लार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी बोडके परिवारातील नऊ आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. परंतु या प्रकरणात खल्लास पोलिसांनी कलमांमध्ये बदल केल्याचा आरोप झिपरकर परिवाराने केला होता.या विषयासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु उपविभागीय अधिकारी यांनी कुठलीही कारवाई न केल्याचा ठपका ठेवत अखेर आज या झीपरकर परिवाराने थेट दर्यापूर पोलीस ठाण्यात अंगावर डिझेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी संजय झीपरकर सारिका संजय झीपरकर व मुलगा यांना ताब्यात घेतले आहे. व पुढील कार्यवाही पोलीस करीत आहे.
या गुन्ह्यातील सर्व 9 आरोपींना कारवाई करत वेळीच अटक करून ताब्यात घेतले होते व तपास करून ज्या कलम लागू आहे त्या गुन्ह्यात तपासा अंती लावण्यात आल्या होत्या व त्यांना न्यायालयात हजर केले होते.
-ठाणेदार रवींद्र बारड
खल्लार पोलीस स्टेशन




