कर्जमुक्तीसाठी बच्चू कडू यांचा एल्गार
बच्चू कडू यांचा महायुती सरकारला इशारा

* 9 ऑगस्टला दिल्लीत मोठे आंदोलन
* बच्चू कडूंचे 117 व्यांदा रक्तदान
अमरावती /27 मार्च – प्रहार जनशक्ती पक्षाचे मुख्य नेते बच्चू कडू यांनी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली आहे. अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात आयोजित एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि कार्यकर्त्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कडू यांनी स्वतः 117 व्यांदा रक्तदान करून आंदोलनाची सुरुवात केली. 117 म्हणजे सरकारला धोका, असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त देशाच्या कृषी मंत्र्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर धडक देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमात सूर्यभान ठगे यांची रक्ततुला, तर संजय गोमकाळे यांची बीजतुला करण्यात आली. तसेच कवी नितीन देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर माजी मंत्री महादेव जानकर, शेतकरी नेते विजय जावंधिया, माजी आमदार वामनराव चटप, माजी नगराध्यक्ष रहमान भाई, संतोष किटुकले, सुरेश गणेशकर, प्रदीप बंड, संजय देशमुख, मंगेश देशमुख, बल्लू जवंजाळ, छोटू महाराज वसू, बंटी रामटेके, दीपक घोंगडे, निखिल ठाकरे, आशिष बंड, ऋषी पोहोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विजय जावंधिया यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीवरून सरकारला धारेवर धरले. या कार्यक्रमाला संजय देशमुख, निलेश पानसे, गोलू पाटील, निलेश ठाकूर, कुणाल खंडारे, विक्रम जाधव, समर्थ डवरे, राहुल ठाकरे, धीरज पिंजरकर, कविता भूसुम, अक्षय भालेराव, निलेश वाटाणे, राजेश कडू आणि असंख्य प्रहार सेवक उपस्थित होते.
किमान आधारभूत किमतीसाठी नवा संघर्ष-शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती 30 जूनपूर्वी न झाल्यास राज्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही आणि त्यांचे कपडे उतरवू, असा इशारा देत माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रक्ताने लिहिलेला संघर्ष-कर्जमुक्तीसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रक्त आणि बीजाची तुला करून सरकारचा निषेध केला. आम्हाला कर्जमाफी नको, तर कर्ज फेडण्याची ताकद द्या, अशी आर्त साद यावेळी शेतकरी नेत्यांनी घातली.




