महायुतीच्या विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले मतदारांचे आभार

* मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले

ठाणे /16 जानेवारी : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप महायुती बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, राज्यभरातील अनेक महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, संपूर्ण एमएमआर आणि मुंबईत महायुतीने जोरदार मुसंडी मारली असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून, एमएमआर परिसरातही चांगल्या जागा मिळाल्या आहेत. मुंबईतही शिवसेना-भाजप महायुतीचा महापौर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बहुमताच्या अगदी जवळ पोहोचलो असून, राज्यात अनेक ठिकाणी महायुती सत्ता स्थापन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी भावनिक मुद्दे, भ्रष्टाचाराचे आरोप आणि विविध प्रकारचा प्रचार करण्यात आला. मात्र, मुंबईकरांनी आणि राज्यातील मतदारांनी भावनिकतेपेक्षा विकासालाच कौल दिला आहे. विकासविरोधी भूमिका घेणार्‍यांना जनतेने नाकारले असून, विकास हाच ब्रँड जनतेने स्वीकारला असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (उबाठा) 150 हून अधिक जागा लढवून सुमारे 60 जागा जिंकल्या, मात्र एकंदरीत जनतेने विकासाच्या अजेंडालाच पाठिंबा दिल्याचे त्यांनी नमूद केले.केंद्रात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता अशा ट्रिपल इंजिन सरकारचा मुंबईला मोठा फायदा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. भारत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असताना, त्या प्रवासात मुंबईचा मोठा वाटा असावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईला जागतिक दर्जाचे, जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित बातम्या

Back to top button