इर्विन परिसरात मानवी अवयवांचे तुकडे
सुनियोजित कटच, आ.प्रवीण पोटे, महायुती सरकारला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप

अमरावती/27 नोव्हेंबर – जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इर्विन परिसरात गुरुवारी सकाळी मानवी शरीराचे वेगवेगळे अवयव आढळल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. एका ठिकाणी शीर, तर दुसर्या ठिकाणी हात-पायांचे तुकडे आढळल्याने हा प्रकार अपघात नसून नियोजनपूर्वक केलेली हत्या असण्याची शक्यता आ. प्रवीण पोटे पाटील यांनी व्यक्त केली. या घटनेमागे मोठे कारस्थान असून महायुती सर कारला बदनाम करण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मृताची ओळख पटलेली नसून शहर कोतवाली पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
गुरुवारी सकाळी इर्विन रुग्णालयाच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मानवी शरीराचे अवयव आढळून आले. ही माहिती मिळताच आरोग्य विभागासह पोलिसांची धावपळ सुरू झाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सर्व अवयव गोळा केले आणि ते शवागारात ठेवले. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया देताना आ. प्रवीण पोटे पाटील यांनी हा साधासुधा प्रकार नसून नियोजनपूर्वक केलेल्या हत्येचा संशय असल्याचे सांगितले. अमरावतीसारख्या शांत शहरात अशा प्रकारची घटना घडणे गंभीर बाब आहे. या प्रकरणामागे कोण आहे, याचा पोलिसांनी सखोल तपास करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे. गुन्हेगारांना तातडीने अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली. शहर कोतवालीचे ठाणेदार रोशन शिरसाट यांनी मात्र शवविच्छेदन आणि मृताची ओळख पटेपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. सर्व अवयव 5 पिशव्यांमध्ये ठेवण्यात आले आहेत. अज्ञात मृतदेहाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार 3 दिवस ओळख पटविण्याचे प्रयत्न केल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला आणि पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून मृताची ओळख आणि घटनेमागचे नेमके कारण शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
संशयास्पद मृत्यूचा तपास महत्त्वाचा
इर्विन रुग्णालय परिसरात मानवी शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा अपघात आहे की हत्या, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. आ. प्रवीण पोटे पाटील यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून पोलिसांनी कोणताही निष्कर्ष न काढता प्रत्येक शक्यता तपासावी. मृताची ओळख पटविणे आणि दोषींना शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे.





