चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पट

पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत एकमताने मंजुरी

चंद्रपूर/27 नोव्हेंबर : राज्यात एकीकडे दुष्काळ असतांना चंद्रपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी स्वतःचे मानधन दुप्पट केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या आज आयोजित सर्वसाधारण सभेत भुयारी गटार योजना आणि अमृत-2 पाणीपुरवठा योजनेच्या मुद्द्यावरून नगरसेवकांमध्ये जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. चंद्रपूर महानगरपालिका आणि गोंधळ हे समीकरण नेहमीचच झालं असतांना मात्र नगरसेवकांच्या मानधनवाढीचा विषय सभेत येताच सर्वच नगरसेवक गुण्यागोविंदाने एकत्र आल्याचे चित्र आज दिसून आले. आमदार, खासदार किंवा राजकीय पुढारी सत्ताधारी आणि विरोधक म्हणून सातत्याने एकमेकांसमोर उभे असतात. अनेकदा विविध मुद्यांवरुन ते भांडत असतात, त्यांचे मतभेद चव्हाट्यावर येतात. मात्र, स्वत:साठी काही मागायचं असेल तर त्यांचा एकोपा पाहायला मिळतो. मग, खासदारांच्या कँटीनचा विषय असो, आमदारांच्या पगारवाढीचा विषय असो किंवा आमदार निवास नव्याने बांधण्याचा विषय असो, सर्वजण एकमेकांना सपोर्ट करतात.

Back to top button