जळगावमधील कुटुंबाची गुजरातच्या कालव्यात ढकलून हत्या

मृत पती-पत्नी विमा घोटाळ्यातील संशयित

जळगाव/25 नोव्हेंबर  : गुजरातमधील बारडोलीजवळ असलेल्या कालव्यात फेकून जळगावच्या पाटील कुटुंबाची हत्या करण्यात आल्याची माहिती आज (25 नोव्हेंबर) समोर आली. सुरतच्या बारडोली तालुक्यातील ‘उवा’ गावाजवळ चार अज्ञात व्यक्तींनी या कुटुंबाची कार अडवून त्यातील सदस्यांना जबरदस्तीने कालव्यात फेकून दिले. या घटनेत पती, पत्नी आणि त्यांची मुलगी अशा तिघांचा मृत्यू झाला असून इतर दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. त्यामुळे बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके शोधमोहीम राबवत आहेत. दरम्यान पाटील कुटुंबातील एक मुलगा कालव्यातून बाहेर आल्याने ही धक्कादायक घटना समोर आली.मात्र आता या हत्या प्रकरणात आणखी एक घटना समोर येत आहे. या हत्याकांडातील मृत पतीपत्नी नितीन उर्फ नितेश पाटील आणि कल्पना पाटील हे दोघेही विमा घोटाळ्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असल्याची माहिती जळगाव पोलिसांनी दिली आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्यात विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या तक्रारीवरून 19 नोव्हेंबर रोजी नितीन उर्फ नितेश पाटील आणि कविता पाटील यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे विमा घोटाळ्याच्या या प्रकरणांचा आणि त्यानंतर झालेल्या नितीन उर्फ नितेश पाटील व कल्पना पाटील यांच्या हत्येचा काही परस्पर संबंध आहे का? याचा शोध आता जळगाव आणि गुजरात पोलीस घेत आहेत. दरम्यान, या हत्याकांडातील आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जळगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी माहिती दिली की, नितीन उर्फ नितेश पाटील, कल्पना पाटील आणि त्यांच्या चार मुलांना गुजरातकडे घेऊन जाणार्‍या वाहनाचा चालक दयानंद भदोने उर्फ खंड्या याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळा येथून अटक केली असून, त्याला गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र आता विमा घोटाळ्याचे संशयित आरोपी असलेल्या पाटील दाम्पत्याची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? विमा घोटाळ्याच्या प्रकरणाचा या हत्याकांडाशी काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येतील, असे संदीप गावित यांनी स्पष्ट केले. मृत पाटील कुटुंब जळगावच्या एरंडोल तालुक्यातील खंडेराव नगर भागात राहत होते आणि ते कामाच्या शोधात 21 नोव्हेंबर रोजी चारचाकी वाहनाने गुजरातला निघाले होते, परंतु वाटेतच ही दुर्दैवी घटना घडली. सुरतच्या बारडोली तालुक्यातील ‘उवा’ गावाजवळ दुसर्‍या एका कारमधून आलेल्या चार व्यक्तींनी त्यांचे वाहन अडवले. त्यानंतर, या कुटुंबातील सदस्यांना बळजबरीने कालव्याच्या खोल पाण्यात फेकून दिले. या घटनेत पती, पत्नी आणि त्यांची मुलगी अशा तिघांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह महुवा तालुक्यातील डु ंगरी परिसरातील एका कालव्यातून सापडले आहेत. तर कुटुंबातील प्रथमेश पाटील आणि हरीश संजय पाटील हे दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे या घटनेदरम्यान, कुटुंबातील 13 वर्षांच्या एका मुलाने कालव्यातील एक पाईप पकडून स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर तो बाहेर पडला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार जवळच्या नागरिकांना सांगितला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, या घटनेप्रकरणी सुरत जिल्ह्यातील बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची आठ स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.

Back to top button