60 लाखांच्या आर्थिक व्यवहारातूनच एअर होस्टेस वर्षा तुरकर यांची हत्या
आईच्या आरोपाने खळबळ

गोंदिया/18 नोव्हेंबर : पुणे येथे इंडिगो एअरलाईन्समध्ये कार्यरत असलेल्या एअर होस्टेस वर्षा तुरकर (35) यांच्या निर्घृण हत्येमागे 60 लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा वाद असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या आईने केला आहे. या आरोपामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, दवनीवाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेला वादच हत्येचे कारण असावा, असा संशय त्यांच्या आईने व्यक्त केला आहे. वर्षा 7 नोव्हेंबर रोजी माहेरी आल्या होत्या. गावाकडे येण्यापूर्वी त्यांनी पैशांच्या व्यवहारासंदर्भात आईशी चर्चा केली होती. मात्र, त्या वेळी आईने या व्यवहाराबाबत सविस्तर माहिती घेतली नव्हती. त्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी गोंदियातील कौटुंबिक परिचित नितेश अग्रवाल याच्यासोबत त्या निघून गेल्या. आर्थिक व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाला असावा आणि त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली असावी, अशी शक्यता त्यांच्या आईने व्यक्त केली आहे. वैनगंगा नदीकाठच्या जंगल परिसरात वर्षा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. उत्तरीय तपासणी अहवालातून त्यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनाक्रम, संशयितांचे जबाब आणि आर्थिक व्यवहारांची पार्श्वभूमी या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.





