गोकुळचा कौल बदलण्याचा शासनाचा प्रयत्न खपवून घेणार नाही

जिल्हाधिकार्‍यांकडे काँग्रेसचे निवेदन

अकोला/10 नोव्हेंबर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादक सभासदांनी दिलेला लोकशाही कौल डावलून शासन नियुक्त सदस्यांच्या माध्यमातून सत्ता समीकरण बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप अकोला जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र गवई यांनी केला आहे. या लोकशाहीविरोधी प्रकाराला विरोध दर्शवत त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करून शासनाचा हस्तक्षेप तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले. संघाच्या 25 संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत या आघाडीचे 13 उमेदवार विजयी झाले. तर सत्ताधारी महायुतीच्या पॅनेल ला केवळ 12 जागा मिळाल्या. अशा प्रकारे दूध उत्पादक सभासदांनी मतदानातून आपला स्पष्ट कौल दिलेला असताना तो मान्य करण्याऐवजी राज्यातील महायुती सरकारकडून शासन नियुक्त सदस्यांच्या माध्यमातून निवडणुकीनंतर सत्तेचे गणित बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शासनाकडून नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करून त्यापैकी चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकार निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविलेल्या संचालक मंडळाच्या अधिकारांवर गदा आणणारा असून सहकार क्षेत्रातील लोकशाही व्यवस्थेला धक्का देणारा आहे. गोकुळ दूध संघ हा केवळ राजकीय सत्ता संघर्षाचा विषय नसून लाखो दूध उत्पादक शेतकरी आणि हजारो दूध उत्पादक संस्थांच्या आर्थिक हिताशी निगडित असलेली महत्त्वाची सहकारी संस्था आहे. या संस्थेचा कारभार कोण चालवणार, हे ठरविण्याचा अधिकार दूध उत्पादक सभासदांनी लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या संचालक मंडळाचा आहे. त्यामुळे राजकीय सोयीनुसार लोकशाही कौल बदलण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महेंद्र गवई यांनी पुढे स्पष्ट केले की, निवडणुकीत जनतेने आणि दूध उत्पादक सभासदांनी दिलेला कौल मान्य न करता निवडणुकीनंतर नियम व सत्तेचे गणित बदलण्याचा प्रयत्न हा लोकशाही व्यवस्थेचा अवमान आहे. सहकार क्षेत्रातील स्वायत्तता अबाधित ठेवण्यासाठी आणि दूध उत्पादक शेतकर्‍यांचा विश्वास टिकविण्यासाठी शासनाने या प्रकरणात तातडीने योग्य कार्यवाही करावी. लोकशाहीत सत्ता ही मतदानातून मिळते, शासन नियुक्त्यांच्या माध्यमातून बहुमत बदलून नव्हे. दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या लोकशाही अधिकारांवर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न काँग्रेस सहन करणार नाही, असा इशाराही महेंद्र गवई यांनी दिला. या वेळी अकोला महानगर कॉग्रेस कमेटि चे विजय तिवारी उपाध्यक्ष, योगेश पाटील संघटन महासचिव ,मनीष मिश्रा ,शुभम गोळे, विष्णुप्रसाद तिवारी ,किशोर अरुडकार , गणेश टाले ,सुनील वानखडे उपस्थित होते.

Back to top button