गुन्हे शाखेतील दोन पदे पाच महिन्यांनंतर रिक्तच

वाकोडे, इंगळे कार्यमुक्त; नव्या नियुक्तीचे आदेश पोलिस आयुक्तांकडे

गुन्हे शाखेच्या दोन पथकांची जबाबदारी नव्या अधिकार्‍यांकडे जाणार

अमरावती/5 नोव्हेंबर – शहर पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील दोन महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकार्‍यांची नियुक्ती कोणाची होणार, याकडे आता संपूर्ण पोलिस विभागाचे लक्ष लागले आहे. सहायक पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे आणि महेश इंगळे यांना बदलीच्या आदेशानंतर तब्बल 5 महिन्यांनी कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या दोन पथकांची जबाबदारी रिक्त झाली असून, या जागांवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत पोलिस दलात चर्चा सुरू झाली आहे.
गृह विभागाने 29 मे रोजी राज्यातील 406 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर केली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत मनीष वाकोडे यांची नागपूर शहर पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली होती. तर महेश इंगळे यांची अमरावती परिक्षेत्रात बदली झाली होती. पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतरही या दोन्ही अधिकार्‍यांना अमरावती शहर पोलिस आयुक्तालयातून कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या नवीन नियुक्तीचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित होता. अखेर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सूचना मिळाल्यानंतर मंगळवारी दोघांनाही कार्यमुक्त करण्यात आले. मनीष वाकोडे हे गुन्हे शाखेच्या पथक क्रमांक 1 मध्ये कार्यरत होते, तर महेश इंगळे यांच्याकडे पथक क्रमांक 2 ची जबाबदारी होती. त्यांच्या कार्यमुक्तीमुळे गुन्हे शाखेतील दोन महत्त्वाच्या जागा रिक्त झाल्या आहेत. दरम्यान, 5 जून रोजी अमरावती पोलिस आयुक्तालयातील 28 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यातील राहुल महाजन यांची गाडगेनगर पोलिस ठाण्यात, तर गाडगेनगरमधील प्रणित पाटील यांची राजापेठ पोलिस ठाण्यात बदली झाली होती. मात्र, पाच महिने उलटूनही त्यांनी नवीन ठिकाणी पदभार स्वीकारला नव्हता. या दोघांच्या बदल्यांचाही प्रश्न आता चर्चेत आला आहे. सध्या शहर पोलिस दलात सुमारे 20 सहायक पोलिस निरीक्षक कार्यरत असून, वरिष्ठ अधिकारी कोणाला संधी देतात, याची उत्सुकता आहे.गुन्हे शाखेतील नियुक्तीवर लक्ष-मनीष वाकोडे आणि महेश इंगळे यांच्या कार्यमुक्तीनंतर गुन्हे शाखेतील पथक क्रमांक 1 आणि 2 ची जबाबदारी रिक्त झाली आहे. या दोन्ही जागांवर नवीन अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांना घ्यायचा आहे. तसेच प्रलंबित बदल्यांनाही गती मिळण्याची शक्यता असून, आगामी नियुक्त्यांकडे पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.

Back to top button