24 तासांत कर्मचार्यांचा वेतन खात्यात जमा करा-मार्डीकर
मनपा कर्मचार्यांची दिवाळी होणार गोड

सर्व अधिकारी, नियमित कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांना मिळाला दिलासा
शहरातील 214 विहिरींमधील गाळ काढण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी
स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांचे प्रशासनाला आदेश
कंत्राटी कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण; आजपासून निर्णयाची अंमलबजावणी
अमरावती/3 नोव्हेंबर – दिवाळीच्या तोंडावर अमरावती महानगरपालिकेतील सर्व अधिकारी, नियमित कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांचे वेतन 24 तासांच्या आत थेट खात्यात जमा करण्याचे कडक आदेश स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी प्रशासनाला दिले. पैशांची चणचण असतानाही इतर निधीतून तात्पुरती व्यवस्था काढून मार्ग काढण्यात आला असून, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहरातील 214 विहिरींमधील गाळ काढण्याच्या प्रस्तावालाही बैठकीत मंजुरी मिळाली.
दिवाळीचा मोठा सण तोंडावर आला असताना महापालिकेच्या कर्मचार्यांचे पगार रखडल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी मनपाच्या सुदाम काका सभागृहात तहकूब झालेली स्थायी समितीची बैठक पुन्हा पार पडली. बैठकीत कर्मचार्यांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला असता, तिजोरीत खडखडाट असल्याने वेतन देण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याचे प्रशासनाने सांगितले. यावर तोडगा काढत सभापती अविनाश मार्डीकर यांनी तातडीने उपलब्ध इतर लेखाशीर्षातून वेतनाची रक्कम वळती करून कर्मचार्यांना देण्याचे स्पष्ट केले. पुढे मनपाला हक्काचा निधी प्राप्त झाल्यावर ही रक्कम परत त्या त्या खात्यात वळती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सणासुदीच्या काळात मनपाच्या एकाही कर्मचार्याची दिवाळी अंधारात जाता कामा नये, अशी आग्रही भूमिका अविनाश मार्डीकर यांनी घेतली. या निर्णयाला उपस्थित सर्व सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असणार्या कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दुसर्या एका महत्त्वाच्या विषयात, अमरावती शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन नगरसेवक मिलिंद बांबल यांनी सार्वजनिक विहिरींची स्वच्छता करण्याचा विषय मांडला. त्यानुसार शहरातील 214 विहिरी, 4060 हातपंप आणि 590 विद्युत पंपांच्या दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी लवकरच निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहिरींची स्वच्छता
शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता 214 सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढण्याचा निर्णय झाला. नगरसेवक मिलिंद बांबल यांच्या सूचनेवरून 4060 हातपंप आणि 590 विद्युत पंपांच्या दुरुस्तीची निविदा काढली जाणार असून, कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना मोठा दिलासा दिला जाईल.





