लाल बावटा युनियनची जिल्हा कचेरीवर धडक

शेतमजुरांना 25 हजार रुपयांची मदत द्या, भूमिहीन मजुरांची संपूर्ण बँक कर्जे माफ करा

अमरावती/4 नोव्हेंबर – दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या प्रत्येक शेतमजूर कुटुंबाला 25 हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी आणि सणासुदीसाठी भूमिहीन मजुरांना 5 हजार रुपयांचे सवलतीचे अनुदान द्यावे, अशी ठाम मागणी लाल बावटा शेतमजूर युनियनने उचलून धरली आहे. यासह मजुरांची संपूर्ण बँक कर्जमाफी, आनंदाचा शिधा वाटप, मनरेगा कामांची त्वरित सुरुवात आणि 15 दिवसांत मजुरी देण्याची मागणी करत संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील शेतमजुरांचे जगणे कठीण बनले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. हाताला काम नसल्यामुळे शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन प्रत्येक शेतमजूर कुटुंबाला तात्काळ 25 हजार रुपयांची रोख मदत दिली पाहिजे. दिवाळी सणाचा विचार करून गरिबांना दिलासा देण्यासाठी भूमिहीन मजुरांच्या खात्यात 5 हजार रुपयांचे सवलतीचे अनुदान जमा करावे. रेशन दुकानांमधून नियमित धान्यासोबतच साखर, गोडेतेल, डाळी आणि इतर आवश्यक किराणा सामान अत्यंत सवलतीच्या दरात वाटप व्हावे. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही सणापूर्वी गोरगरिबांना आनंदाचा शिधा दिला जावा.ग्रामीण भागातील मजुरांना जगण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यानुसार प्रत्येक जॉब कार्ड धारकाला हक्काचे काम देणे बंधनकारक आहे. गावागावांतील ग्रामपंचायत अधिकार्‍यांनी नमुना 4 नुसार कामाचे अर्ज स्वीकारून मजुरांना नमुना 5 नुसार पोहोच पावत्या देण्याचे स्पष्ट आदेश जिल्हा प्रशासनाने काढावेत. दुष्काळावर मात करण्यासाठी नाले खोलीकरण, पाझर तलाव, बंधारे बांधणे आणि जलसंधारणाची सामूहिक कामे तातडीने हाती घ्यावीत. या कामांवर स्थानिक मजुरांना प्राधान्याने रोजगार देऊन काम सुरू झाल्यापासून 15 दिवसांच्या आत त्यांची मजुरी थेट खात्यात जमा करावी.
भूमिहीन मजुरांवर असणारे राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा सहकारी बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स संस्थांचे संपूर्ण कर्ज शासनाने माफ करावे, असा आग्रह यावेळी धरण्यात आला.
मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मजुरांनी जोरदार निदर्शने करून आपल्या हक्कांचा आवाज बुलंद केला. यावेळी लाल बावटा संघटनेचे पदाधिकारी संजय मांडवधरे, ज्ञानेश्वर मेश्राम, तुकाराम भस्मे, प्रवीण वाडे, सचिन पुनसे, देवानंद भागवतकर, मिलिंद गजभिये, हेमंत वानखडे, सुरेश विरूळकर, माला वानखडे, सुरेश शंभरकर, नईम साईद मिर्झा, अर्चना तांडे, अरविंद तांबे, तात्यासाहेब आठवले, रंजना लोणारे, सविता सवाई, शोभा लव्हाडे, निर्मला पांडे, सुरेश शंभरकर आदी उपस्थित होते.

Back to top button