आरोपींना फाशीची शिक्षा द्या
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात नातेवाईकांची मागणी

* पुणे कोर्टाबाहेर ठिय्या आंदोलन
पुणे /4 नोव्हेंबर: मुकुंदनगर परिसरातील 29 वर्षीय विवाहित पायल अक्षय झांबरे यांच्या आत्महत्या प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी मोठी कारवाई करत पतीनंतर आता सासू मंगला झांबरे आणि सासरे अरविंद झांबरे यांनाही अटक केली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सासू-सासर्यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वीच संतप्त नातेवाईक, कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी पुणे कोर्टाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.
जोपर्यंत पायलला पूर्ण न्याय मिळत नाही आणि सर्व आरोपींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.अरविंद झांबरे आणि मंगला झांबरे यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळताच शिवगंगा खोर्यातील ग्रामस्थ आणि पायलच्या माहेरचे नातेवाईक, तिची आई आणि भाऊ यांनी पुणे कोर्टाबाहेर मोठी गर्दी केली. कोर्टाच्या दारात ठिय्या मांडत आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. कोर्टाबाहेर जमलेल्या नातेवाईकांनी झांबरे कुटुंबावर गंभीर आरोप करत आपला आक्रोश व्यक्त केला. पायल ही प्रचंड हुशार, धाडसी आणि शिवगंगा खोर्याची लेक होती. तिने या नराधमांचा कायम धैर्याने सामना केला. मात्र, सासरच्या सततच्या छळामुळे अखेर तिचा तोल सुटला. आपल्यामुळे माहेरच्या लोकांना त्रास होऊ नये, जीव दिल्यावरच यांना शांती मिळेल या उद्विग्न भावनेतून तिने हे टोकाचे पाऊल उचलले अशी संतप्त प्रतिक्रिया एका नातेवाईक महिलेने दिली. अशा लोकांना समाजाने पूर्णपणे बेदखल केले पाहिजे आणि या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे.





