मेळघाटात पट्टेधारी वाघाची दहशत; गुरांचा फडशा
चिखलदर्याच्या मोथा, मड़की, कामापूर गावातील घटना

एका महिन्यात 15 पेक्षा अधिक जनावरे ठार; तीन म्हशी गंभीर
चिखलदरा /7 ऑक्टोबर- मेळघाटच्या जंगलालगत असलेल्या मोथा, मड़की आणि कामापूर परिसरात पट्टेरी वाघाने धुमाकूळ घातला असून महिनाभरात 15 पेक्षा जास्त पाळीव जनावरांना ठार केले. ताज्या हल्ल्यात वाघाने 3 म्हशींवर तुटून पडत रक्तबंबाळ केल्यामुळे संपूर्ण शिवारात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतीसोबतच दूध व्यवसाय करून उदरनिर्वाह करणार्या आदिवासी व गवळी बांधवांचे मोठे नुकसान झाले असून वनविभागाने तात्काळ ठोस बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
मोथा, मड़की तसेच कामापूर ही गावे घनदाट जंगलाला लागून वसलेली आहेत. येथील बहुतांश आदिवासी आणि गवळी बांधव शेतीसह दूध व्यवसायावर आपले पोट भरतात. गावकरी नेहमीप्रमाणे आपली जनावरे रानात चरायला घेऊन जातात. मात्र जंगलात दबा धरून बसलेला वाघ अचानक गुरांवर हल्ले चढवत आहे. यामुळे जंगलात गुरे चरण्यासाठी घेऊन जाणे अत्यंत धोक्याचे ठरत आहे.मागील काही दिवसांत उत्तम बेदाजी येवले यांची गाय, राजा नामदेव शनवारे यांची गाय, विठ्ठल महादेव खंडारे यांचा हेला, लमल हीरामल बेलसरे यांची गाभण गाय आणि किशन शंकरजी पाटील यांचा बैल वाघाने जागीच मारला. काल फकीर तुकाजी शनवारे यांच्या 3 म्हशींवर अचानक हल्ला चढवला. त्यात 1 म्हैस जागीच दगावली असून 2 म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. एकापाठोपाठ पाळीव जनावरे मारली जात असल्याने पशुपालक पुरते हतबल झाले आहेत. हा संपूर्ण परिसर मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या कक्षेत मोडतो. जंगल हे वन्यजीवांचे मूळ घर असल्याने चराईदरम्यान असे हल्ले घडतात. घटनास्थळांचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकर्यांना शासकीय नियमांनुसार योग्य आर्थिक मदत देण्याची कार्यवाही सुरू असल्याची ग्वाही वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. सोळंकी यांनी दिली.





