मेळघाटातील 12 रुग्णवाहिका उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

जिल्हा परिषदेत एक महिन्यापासून वाहने धूळखात उभी

आचारसंहिता की पालकमंत्र्यांच्या उद्घाटनाची खोटी वाट

मेळघाट /7 ऑक्टोबर – दुर्गम भागातील गरीब रुग्णांचे हाल सुरू असताना जिल्हा नियोजन समितीच्या 3 कोटी रुपयांच्या निधीतून घेतलेल्या 12 नव्या रुग्णवाहिका गेल्या 1 महिन्यापासून जिल्हा परिषद आवारात केवळ नेत्यांच्या उद्घाटनासाठी धूळखात उभ्या राहिल्याने आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार उघडा पडला.
मेळघाटातील अतिदुर्गम पाड्यांमध्ये गरोदर माता, लहान मुले आणि गंभीर आजारी रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकांचा मोठा आधार असतो. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि केवळ राजकीय उद्घाटनाच्या हव्यासापोटी कोट्यवधी रुपयांची नवी वाहने सेवा देण्याऐवजी धूळखात पडून आहेत. प्रशासनाकडून अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात येत आहे. तरीही लोकांमध्ये मात्र बड्या नेत्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून घेण्याच्या मोहामुळेच गाड्या अडकून पडल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या मते, आपत्कालीन वैद्यकीय सेवेला अशा कोणत्याही औपचारिक कार्यक्रमासाठी रोखून ठेवणे अत्यंत चुकीचे आणि बेजबाबदारपणाचे आहे.
आरोग्य विभागाच्या ताफ्यातील जुन्या रुग्णवाहिका भंगार अवस्थेत पोहोचल्या आहेत. जुनी वाहने लिलावात काढणे आणि नव्या गाड्या थेट रस्त्यावर उतरवणे यातील प्रशासकीय ताळमेळ पूर्णपणे बिघडला आहे. खरेदी केलेल्या एकूण 12 गाड्यांपैकी 11 रुग्णवाहिका एकट्या मेळघाटातील वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना तर 1 गाडी शिराळा प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळणार आहे. डोंगरदर्‍यातील खडतर रस्त्यांवर जीवन आणि मृत्यूच्या संघर्षात धावणार्‍या या वाहनांना आवारात बंद ठेवल्याने सामान्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या संपूर्ण प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी सांगितले की, या रुग्णवाहिका जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी केल्या आहेत. सध्या या वाहनांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची नोंदणी, क्रमांक फलक आणि इतर तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी आहे. पुढील 10 ते 15 दिवसांत ही संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच सर्वच्या सर्व गाड्या संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे तात्काळ सुपूर्द केल्या जातील.

Back to top button