गणेशोत्सवातून शाश्वत पीकेव्हीच्या शेतीचा अविष्कार
कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचा अनोखा उपक्रम

अकोला /15 सप्टेंबर – वातावरण बदलाचे दृष्टचक्र भेदण्यासाठी आधुनिक कृषि तंत्रज्ञान आणि माती -पाणी तथा पर्यावरण संवर्धन आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू कर्नल प्रा डॉ शरद गडाख यांनी केले. विद्यापीठा अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या रायगड मुलांच्या वसतिगृहातील रायगड गणेशोत्सव मंडळात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने श्री गणरायाच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित तरुणाईला ते संबोधित करत होते.
या प्रसंगी कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. काळबांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयातील शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद, विविध विभागांचे, विभागप्रमुख, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशमूर्तीच्या स्थापनेनंतर सन्माननीय कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. आर. काळबांडे यांच्या हस्ते विधिवत आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने गणरायाचे दर्शन घेतले. गणपती बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण वसतिगृह परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, हरित परिसर निर्मिती आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.याचबरोबर विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या विशेष संकल्पनेवर आधारित विविध कार्यरत प्रतिकृतींचे सादरीकरण केले. यामध्ये ‘शेतीचा विकास’, ‘कृषी फार्मस्टेड’, ‘कचर्यापासून संपत्ती’ आणि ‘मातीपासून अंतराळापर्यंत’ या विविध विषयांचा समावेश करण्यात आला. या संकल्पनांच्या माध्यमातून शेतीतील पारंपरिक पद्धतींपासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत झालेली प्रगती, कृषी क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानाचा वापर, कचर्याचे उपयुक्त संसाधनांमध्ये रूपांतर तसेच मातीपासून अंतराळ संशोधनापर्यंत विज्ञान व तंत्रज्ञानाची झालेली प्रगती विद्यार्थ्यांनी सर्जनशील पद्धतीने मांडली.या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी गरम हवा भट्टी, वाहक पट्टा आणि पावसाचे पाणी साठवण व्यवस्था यांसारख्या विविध कार्यरत प्रतिकृती तयार करून त्यांचे प्रात्यक्षिक सादर केले.





