जेलमध्ये टाकले तरी आता माघार नाही

मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने जरांगे आक्रमक

15 सप्टेंबरला मराठे मुंबईत धडकणारच

जालना/13 सप्टेंबर : मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. 29 ऑगस्टपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. तेव्हापासून सरकारकडून मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, प्रसाद लाड यांनी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. मात्र, त्यांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यामुळे आता त्यांनी आता आरक्षणासाठी मुंबईत धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे पाटील हे 15 सप्टेंबरला अंतरवालीतून मुंबईकडे येण्यासाठी निघणार आहेत. त्यानंतर 19 सप्टेंबरपासून ते आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत. परंतु, त्यांच्या या आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ज्यानंतर आता जरांगेंकडून मोठा इशारा देण्यात आला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 19 सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी परवानगी मागितली होती. आंदोलन शांततेच्या मार्गाने आणि पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी-शर्तींचे पालन करून करण्याचे हमीपत्रही देण्यात आले होते. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. ज्यानंतर आता त्यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी म्हटले आहे की, आम्ही संविधानाप्रमाणे चालतो. सरकारने कायदा पायदळी तुडवला तर न्यायालय न्याय देते. आम्ही सरकारच्या नियमांशी बांधील नाही. सरकारचे नियम आम्ही मानत नाही. द्वेष भावनेने परवानगी नाकारली आहे. जरांगे मुंबईत आंदोलन करू शकतात असे न्यायालय म्हणत असताना यातून द्वेष उफाळून येत आहे, गेल्यावर्षी देखील गणेशोत्सव होता. तरीही आम्ही शांततेत आंदोलन केले. मिरवणूक गणेशोत्सवाची देखील होईल, ठरल्याप्रमाणे आम्ही उपोषण करू. आमचे वकील आजपासून कामाला लागतील, अशी माहिती जरांगेंनी दिली.तर, वकील आता ठरवतील पोलीस आयुक्त यांच्याकडे जायचे की आणखी काय करायचे. पोलीस निरीक्षकांनी कायदा पायाखाली तुडवला आहे. सोयीनुसार कायदा चालवता येणार नाही. राज्य अस्थिर करण्याचे काम मुख्यमंत्री करत आहे. गेल्यावर्षी कायदा नव्हता का हे नवीन कायदा चालवणारे झाले का? फडणवीस यांना न्यायदेवतेसह सगळ्यांचा अवमान करायचा आहे, राज्य दूषित करायचे आहे, आम्ही तर आदेश पाळून आंदोलन करणार आहोत, ही हुकूमशाही आणि गुंडगिरी आहे, मी तुम्हाला शरण येणार नाही, गुडघे टेकणार नाही आडमुठ्या सरकारचे धोरण आम्हाला मान्य नाही, तुम्ही असे करणार असाल तर आजपासून पाणी आणि औषधोपचार देखील मी बंद करत आहे, राज्य तुम्हाला अस्थिर करायचे आहे आम्हाला नाही, या सगळ्या गोष्टीला फडणवीस जबाबदार आहेत, असा इशारा आता जरांगेंनी दिला आहे.

Back to top button