सदोष व्हेंटीलेटर पुरवठा करणार्‍या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाका

खा. बळवंत वानखडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अमरावती /26 ऑगस्ट- जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात झालेल्या भीषण आगीनंतर वैद्यकीय उपकरणांच्या दर्जाचा प्रश्न गंभीरपणे पुढे आला आहे. या घटनेला जबाबदार ठरणार्‍या कंपनीची चौकशी करून दोष आढळल्यास तिला तातडीने काळ्या यादीत टाकावे आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी खा. बळवंत वानखडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक भूमिका घेतल्याचे खा. बळवंत वानखडे यांनी सांगितले.
डफरीन रुग्णालयातील दुर्घटनेनंतर नवजात बालकांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या उपकरणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित कंपनीच्या कृत्रिम श्वसन यंत्रांमध्ये किंवा इतर उपकरणांमध्ये त्रुटी आढळल्यास कंपनीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी खा. वानखडे यांनी केली. राज्यातील इतर शासकीय रुग्णालयांतही याच कंपनीची कृत्रिम श्वसन यंत्रे किंवा अन्य वैद्यकीय उपकरणे वापरात असल्यास त्यांची तातडीने तांत्रिक तपासणी करावी, याकडे लक्ष वेधले आहे. सदोष उपकरणे पुरवठा करणार्‍या कंपनीविरोधात कारवाई करणे याकडे लक्ष वेधले आहे. तसेच नविन कंपनीकडे जबाबदारी सोपवून दर्जेदार उपकरणे उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डफरीनमधील घटनेने संपूर्ण राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. केवळ चौकशी समिती नेमून प्रकरण थांबविण्याऐवजी दोष निश्चित करून जबाबदारांवर कारवाई झाली पाहिजे. रुग्णालयातील नवजात बालके आणि गंभीर रुग्णांची सुरक्षितता ही सरकारची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे खा. वानखडे यांनी स्पष्ट केले.

राज्यभर वैद्यकीय उपकरणांची तपासणी आवश्यक
डफरीन दुर्घटनेनंतर संबंधित कंपनीच्या उपकरणांची विश्वासार्हता तपासणे गरजेचे आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांत अशी उपकरणे वापरात असल्यास त्यांची तातडीने तांत्रिक तपासणी करावी. त्रुटी आढळल्यास उपकरणे बदलून सुरक्षित साधने उपलब्ध करावीत. निष्काळजीपणामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी खा. बळवंत वानखडे यांनी केली.

संबंधित बातम्या

Back to top button