भरधाव हायवाने दोन बहिणींना उडवले, एकीचा मृत्यू
संतप्त जमावाने हायवा अडवला

छत्रपती संभाजीनगर/25 ऑगस्ट : शाळा सुटल्यानंतर आनंदाने घरी परतणार्या दोन चिमुरड्या बहिणींवर काळाने अत्यंत क्रूर घाला घातला. शाळेच्या बसमधून उतरून घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या एका अनियंत्रित हायवा डंपरने दोन्ही बहिणींना चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली.
या भीषण अपघातात अवघ्या 7 वर्षांच्या आरुषी कृष्णा तिवारी या बालिकेचा जागीच अत्यंत विदारक अंत झाला, तर तिची 16 वर्षीय मोठी बहीण नंदिनी तिवारी ही गंभीर जखमी झाली आहे. आज, मंगळवारी (दि. 25) दुपारी चार वाजेच्या सुमारास विटावा ते एकलहेरा रस्त्यावरील गट क्रमांक 27 जवळ ही थरारक दुर्घटना घडली. मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी असलेले कृष्णा तिवारी हे पोटापाण्यासाठी वाळूज औद्योगिक परिसरालगत एकलहेरा येथे सहकुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी, चार मुली व एक लहान मुलगा असा परिवार आहे. मंगळवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर आरुषी आणि तिची मोठी बहीण नंदिनी या दोघी शाळेच्या बसने घरी परत आल्या. एकलहेरा शिवारातील घरासमोर बस थांबल्यानंतर दोघी बसमधून सुखरूप खाली उतरल्या. त्यानंतर बसच्या पाठीमागून त्या रस्ता ओलांडत असतानाच समोरून अतिवेगात आलेल्या एका हायवा डंपरने त्यांना जोरदार धडक देऊन चिरडले.हायवाचा वेग एवढा प्रचंड होता की, चाकाखाली आल्याने आरुषीचे शरीर अक्षरशः छिन्नविच्छिन्न झाले. हा अंगावर काटा आणणारा अपघात पाहताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. संतप्त झालेल्या ग्रामस्थ व नागरिकांनी काही काळ संबंधित हायवा वाहन अडवून धरले आणि औद्योगिक परिसरातील अवजड वाहनांच्या बेदरकार वेगाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.




