पातळगंगा नदीतून 3 हजार सिलेंडर वाहून गेले
टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकार्यांचं आवाहन

रायगड /8 जुलै: मुंबई, कोकणासह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडला असून अनेक दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. रायगड जिल्ह्याच्या खालापूरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या 3 हजार सिलेंडरच्या टाक्या वाहून जाण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पाताळगंगा नदीमधूनवाहून जाणारे सिलेंडर नागरिकांनी गोळा केल्याचा प्रकारही समोर आला आहे. सिलेंडरच्या टाक्या सापडलेल्या व्यक्तींना पुन्हा तहसीलदार किंवा संबंधित डीलरकडे त्या टाक्या जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील खालापूरमधील एलपीजी
बॉटलिंग प्लॉट, चावणे यांचे गोडाऊनमधील सिलेंडर असल्याची माहिती उघडकीस आली आहे. खालापूर येथील प्लॉट नं इ-1/7, अतिरिक्त एमआयडीसी, चावणे भागातील सर्व सिलेंडर पाताळगंगा नदीमध्ये वाहून गेल्याची आजची घटना घडली होती. त्यानंतर, पुरवठा विभागाने याबाबत माहिती घेतली असता परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हे सिलेंडर वाहून
गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.




