आरटीओच्या 3 अधिकार्यांची तडका-फडकी बदली
अमरावतीचे अधिकारी रुजू होण्यासाठी तातडीने रवाना

अमरावती/7 जुलै – परिवहन विभागाने मोटार वाहन निरीक्षक संवर्गातील 150 अधिकार्यांच्या संगणकीय प्रणालीद्वारे प्रशासकीय कारणास्तव घाऊक बदल्या केल्या असून यात अमरावती जिल्ह्यातील तीन अधिकार्यांना मोठा झटका
बसला. न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेला हा बदली मार्ग मोकळा होताच शासनाने तातडीने नवीन जागी रुजू होण्याचे कडक निर्देश दिले असून दिरंगाई करणार्यांवर थेट अकार्यदिनाची टांगती तलवार ठेवली आहे. या मोठ्या फेरबदलात अमरावती कार्यालयातील विपीन दामोधरराव लेदाडे यांची वैजापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात बदली करण्यात आली. तसेच अमरावतीचे दुसरे अधिकारी प्रमोद सुखदेवराव घाटोळ यांची बारामती येथे रवानगी झाली असून कैलाश संभाजी भरकाडे यांना कल्याण कार्यालयात पाठवले आहे.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या नागपूर खंडपीठाने बदली आदेशाला स्थगिती देणारा अर्ज फेटाळल्याने 6 जुलै रोजी हा अंतिम निर्णय घेण्यात आला. संबंधित नियंत्रण अधिकार्यांनी या सर्व अधिकार्यांना सध्याच्या पदभारातून तातडीने कार्यमुक्त करून नव्या ठिकाणी हजर होण्यास बजावले असून त्यांना परिवहन आयुक्तांमार्फत शासनाकडे अहवाल सादर करावा लागणार आहे. या अचानक झालेल्या फेरबदलामुळे संपूर्ण जिल्ह्यातील परिवहन वर्तुळात एकच खळबळ उडाली.




