विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सातारा /8 जुलै: फलटण तालुक्यातील खामगावमध्ये दुर्दैवी घटना घडली असून एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या शॉकने जागीच मृत्यू झाला आहे. घराच्या अंगणात कुटुंबातील व्यक्तीला शॉक लागल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यही धावले. मात्र या प्रयत्नात एकमेकांना पकडल्याने विजेचा शॉक लागून आई, वडील, मुलगा आणि मुलगी,
असे चौघेही मृत्युमुखी पडले. सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय 45), गंगुबाई सतीश शिंदे (वय 40), सचिन सतीश शिंदे (वय 26) आणि आरती सतीश शिंदे (वय 24, रा. खामगाव, ता. फलटण), अशी मृतांची नावे आहेत.या घटनेबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी पहाटे 6 वाजण्याचा सुमारास सतीश उर्फ पिसुरड्या शिंदे हे घराबाहेर थांबले होते. यावेळी ते विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यानंतर सतीश यांना विजेचा शॉक लागला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पत्नी आणि मुलांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, सतीश शिंदे यांच्यानंतर त्यांची पत्नी आणि दोन मुलांनाही विजेचा जबर धक्का बसला.विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेलं शिंदे कुटुंब हे फलटण तालुक्यातील खामगावातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ वास्तव्यास होतं. बुधवारी सकाळी उठून घराबाहेर आलेल्या सतीश उर्फ
पिसुरड्या किसन शिंदे यांना विजेचा जोरदार झटका बसला. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील चौघांचाही जागीच अंत झाला.




