देश जलमय
जम्मूच्या डोडात ढगफुटी,लोणावळा-वायनाडमध्ये भूस्खलन

भोपाळ/7 जुलै -जम्मू- काश्मीरमधील डोडा जिल्ह्याच्या वरच्या भागात ढगफुटी झाल्यामुळे दरडी कोसळून ढिगारा निवासी वस्त्यांमध्ये घुसला. यामुळे रस्त्यांवरील अनेक वाहने गाडली गेली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत गेल्या 48 तासांत सुमारे 15 इंच (380 मिमी) पावसाची नोंद झाली असून, हवामान विभागाने (खचऊ) मंगळवारसाठी ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईतील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
करण्यात आली आहे.नाशिकमधील शाळा आणि महाविद्यालयेही आज बंद आहेत. त्र्यंबकेेशर मंदिर आणि महाराष्ट्रातील ’साडेतीन’ शक्तिपीठांपैकी एक असलेले सप्तशृंगी मंदिर आज भाविकांसाठी बंद राहणार आहे.दरम्यान, केरळमधील वायनाड येथे एका बोगद्याच्या (टनेल) प्रकल्पाच्या ठिकाणी मंगळवारी दरड कोसळण्याची घटना घडली. दरड कोसळल्याने पाच जण जखमी झाले असून, त्या सर्वांवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वायनाडमध्ये-लोणावळामध्ये भूस्खलन
वायनाड: केरळमधील वायनाडमध्ये मंगळवारी सकाळी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत 3
लोकांचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. अनेक लोक ढिगार्याखाली दबले असल्याची माहिती आहे. ही दुर्घटना कल्लाडी येथील मीनाक्षी पुलाजवळ घडली.येथे मलप्पुरम-वायनाड बोगदा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. बोगद्यातून माती काढून बाहेर जमा करण्यात आली होती. पावसामुळे माती सरकली, ज्यामुळे झाडे उन्मळून पडली
आणि बॅरिकेड्सही वाहून गेले.
पुणे– राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पूरपरिस्थिती, झाडे पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच लोणावळा येथील ’नॉर्थ पॉइंट’ आणि ’थ्री सिक्सटी रिसॉर्ट’ परिसरात आज अचानक भीषण भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत मातीच्या ढिगार्याखाली दोन व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, वाढत्या पावसामुळे
दरडी कोसळण्याच्या धोक्यात आणखी भर पडली आहे.या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची मदत पथके तातडीने
घटनास्थळी दाखल झाली आहेत. उपविभागीय अधिकारी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू असून, मातीचा ढिगारा बाजूला करून अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.




