राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान उत्साहात
आ.सुलभा खोडके यांच्या हस्ते बालकांना पाजले ‘दोन थेंब जीवनाचे’

अमरावती /28 जून- देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन कायम राखण्यासाठी आणि प्रत्येक बालकाला पोलिओपासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे. आज देशाची पोलीस मुक्त भारताकडे वाटचाल सुरु आहे. परंतु आसपासच्या देशांमध्ये पोलीओची जोखीम लक्षात घेता आज 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली.
पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ लसीचे दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन अमरावतीच्या आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत आज, 28 जून रोजी संत गाडगे बाबा मंदिर लसीकरण केंद्रावर 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ अमरावतीच्या आ.सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकांची आपल्या बालकांना पोलिओ डोज देण्यासाठी लगबग दिसून आली. तसेच आरोग्य कर्मचार्यांची टीम सुद्धा या राष्ट्रीय कार्यात मोठ्या जोमाने तैनात होती. लसीकरण अभियानाप्रसंगी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष तोटे, पीएचएन प्रतिभा थोरात, डॉ. स्वाती कोवे , एमपीडब्लू संतोष जोगी, आरोग्य सहायक हैदर अली, आरोग्य सेविका बकुला पायघन यांचेसह मनपा शहरी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.




