आषाढी यात्रा : विठुरायाचे दर्शन अधिक सुलभ होणार

पंढरपूरसाठी 175 जादा बसेस

-अमरावती विभागाच्या 8 आगारात व्यवस्था
अमरावती/ 23 जून : आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात जात असतात. भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाच्या 8 आगारांमधून 175 विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 6 जुलैला सर्वत्र साजर्‍या होणार्‍या आषाढी एकादशी निमित्त भाविक मोठ्या संख्येने पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असतात. पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून दरवर्षी जादा बसेसची सोय उपलब्ध करून देण्यात येत असून यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
एसटी प्रशासनाने पंढरपूरला भाविकांना जाण्यासाठी चंद्रपूर, राजुरा, चिमूर आणि वरोरा आगारातून 25 अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली आहे. भाविकांच्या वाढत्या मागणीनुसार प्रशासनाकडून आणखी बसेस वाढविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. विठू नामाचा गजर करत असंख्य पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. हजारो वारकर्‍यांच्या सेवेसाठी लालपरीसुद्धा सज्ज झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 8 आगारांमधून 175 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. 1 जुलैला दुपारी 12 वाजता पहिली बस पंढरपूरसाठी रवाना होत आहे. ही बस 2 जुलैला सकाळी 10 वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाकडून पंढरपूरला जाणार्‍या भाविकांसाठी यात्रा विशेष बसेस सोडण्यात येत आहेत. 6 जुलैला आषाढी एकादशी असून, भाविकांना त्यापूर्वी नियोजित तीर्थस्थळी पोहोचता यावे, यासाठी 2 ते 13 जुलै या कालावधीत यात्रा स्पेशल बसेस सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेने यंदा 27 अधिक बसेसची व्यवस्था केली आहे. मागील वर्षी 124 बसेस पंढरपूरकरिता मिळाल्या होत्या. राज्यभरातून वारकरी दिंडी, पालखी घेऊन पंढरपूर येथे दाखल होतात. या दरम्यान रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. ते पाहण्यासाठी भाविक आधीच पोहचत असतात. अमरावती आगारातून सर्वाधिक 29 बसेस सोडण्यात येणार असून बडनेरातून 25, परतवाडा आगारातून 26, वरूडमधून 20, चांदूर रेल्वेमधून 15, दर्यापूर मधून 20, मोर्शीमधून 20 आणि चांदूर बाजार आगारातून 20 बसेस सोडण्यात येणार आहेत.
-असे राहणार प्रवास भाडे
अमरावती-पंढरपूर : 946 रुपये
दर्यापूर-पंढरपूर : 926 रुपये
परतवाडा-पंढरपूर : 1026 रुपये
वरूड-पंढरपूर : 1096 रुपये
चांदूर रेल्वे-पंढरपूर : 997 रुपये
मोर्शी-पंढरपूर : 1036 रुपये

संबंधित बातम्या

Back to top button