एसआयआर दुसरा टप्पा महिनाभर पुढे ढकलण्यात यावा
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे थेट निवडणूक आयोगाला पत्र

वारकर्यांची नाव वगळली जाण्याची भीत
मुंबई/28 मे- केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ‘एसआयआर’ मोहीम 30 जूनपासून महाराष्ट्रात सुरू होणार आहे. मतदार याद्या अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी या मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदींची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. परंतु या मोहिमेबाबत काँग्रेसकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा किमान महिनाभर पुढे ढकलण्यात यावा, अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने 14 मे 2026 रोजी मतदार यादी पुनरिक्षण एसआयआर डखठ कार्यक्रम घोषित केला असून महाराष्ट्रात मॅपिंगचे काम अंदाजे 72 टक्क्यापर्यंत झाले असल्याचे आयोगाने दिलेल्या माहितीवरून समजते. दि. 19 जून 2026 पर्यंत हे काम सुरु राहणार असून दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै 2026या कालावधीत राबविला जाणार असल्याचे समजते, यासाठी बीएलओ घरोघरी जाऊन गणना प्रपत्र वाटप करून मतदारांकडून भरून घेतले जाणार आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असून या कालावधीत आषाढी वारी आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जवळपास 20 हून अधिक जिल्ह्यातील वारकरी या कालावधीत पंढरपूरला वेगवेगळ्या दिंड्यांमधून पायी जात असतात, ते घरी नसल्याने त्यांची नावे वगळली जाऊ शकतात, अशी भीती काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली आहे.




