अकोल्याच्या गजानन पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा, गुंतवणूकदार अडचणीत
मुख्य आरोपी व्यवस्थापक नंदकिशोर आवारे गजाआड

शेकडो ठेविदारांचा गुंतवणूकदारांच्या ठेवी अडकल्या
अकोला/28 मे- शहरातील डाबकी रस्त्यावरील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल 16 कोटी 79 लाख 27 हजार 930 रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी व्यवस्थापक नंदकिशोर नारायण आवारे याला अटक केली आहे. जिल्हा विशेष लेखा परीक्षक स्मिता प्रल्हाद जाधव यांच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंबंध संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घोटाळ्यामुळे अकोल्यातील हजारो सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे अडकले असून संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाने मुख्य आरोपीला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून त्याचे वडील व संस्थेचे अध्यक्ष नारायण काशिराम आवारे हे आजारी असल्याने त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पतसंस्थेच्या संचालक मंडळाने आणि मुख्य अधिकार्यांनी ठेवीदारांचा विश्वास संपादन करून हा कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आणि मुदत संपूनही लोकांचे पैसे परत न करता फसवणूक केली. या गंभीर प्रकरणाची चौकशी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सन 2022 पासून सुरू होती. आतापर्यंत 182 फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या असून हा घोटाळा आणखी मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वसामान्य लोकांच्या पैशांचे रक्षण करण्यासाठी पोलीस यंत्रणा सखोल तपास करत असून ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे आणि त्यांच्या विशेष तपास पथकाने पूर्ण केली आहे.
चौकशी रखडल्याने फसवणुकीचा आकडा वाढला-सहकार विभागाच्या संथ कारभारामुळे सन 2022 पासून सुरू असलेल्या या चौकशीला कमालीचा उशीर झाला आणि त्यामुळेच अपहाराची रक्कम वाढल्याचा आरोप संतप्त नागरिक करत आहेत. सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून जप्त कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.




