विदर्भात उष्णतेची लाट कायम

चंद्रपूर आणि वर्ध्यात हवामान विभागाकडून ’रेड अलर्ट’ जारी

नागपूर/28 मे-राज्याच्या काही भागांत गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट अद्यापही कायम असल्याने नागरिक उन्हाच्या कडाक्याने प्रचंड हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळी लोक घराबाहेर पडणे टाळत असल्याने रस्त्यांवरही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. याच भीषण तापमानाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामान विभागाने आज चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून, या धोक्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उन्हात घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड कहर पाहायला मिळत असून, मागील आठवड्यापासून संपूर्ण जिल्हा उन्हाच्या तीव्र झळांनी अक्षरशः होरपळून निघत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी आज उष्णतेचा रेड अलर्ट, तर शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होऊन उकाड्याची हीच स्थिती कायम राहण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या भीषण उष्णतेच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उन्हात विनाकारण बाहेर पडणे टाळावे आणि आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे महत्त्वपूर्ण आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button