सध्याचे युद्ध भारतच थांबवू शकतो

जग विनाशाच्या उंबरठ्यावर; संघप्रमुख मोहन भागवतांचं वक्तव्य

नागपूर /20 मार्च : जागतिक पातळीवर वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संघप्रमुख मोहन भागवत यांनी गंभीर चिंता व्यक्त करत आजची युद्धे ही केवळ स्वार्थासाठी होत आहेत आणि जग विनाशाच्या काठावर उभे आहे, असे ठाम मत व्यक्त केले.
नागपुरात विश्व हिंदू परिषदाच्या विदर्भ प्रांत कार्यालयाच्या शिलान्यास कार्यक्रमात ते बोलत होते. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, सध्याच्या घडीला जग अस्थिरतेच्या अवस्थेतून जात आहे. विविध देशांमध्ये सुरू असलेले संघर्ष, युद्धजन्य वातावरण आणि वर्चस्वासाठी चाललेली स्पर्धा ही सर्व स्वार्था तूनच उद्भवलेली आहे. माझ्याकडे जे नाही ते दुसर्‍याकडून घेऊन येईन ही मानसिकता युद्धांना कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, जगात सर्वांना एकत्र जोडणारा कोणताही प्रभावी तत्व आज अस्तित्वात नाही. मात्र, भारताकडे हे सामर्थ्य आहे. सर्वांना जोडून ठेवण्याची ताकद भारतात आहे. आपल्या ऋषी-मुनींनी दिलेल्या ज्ञानामुळेच हे शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, जगभरातून भारताकडे आशेने पाहिले जात आहे आणि काही ठिकाणी असा विश्वासही व्यक्त केला जात आहे की सध्याचे युद्ध भारतच थांबवू शकतो असेही भागवत म्हणाले. भागवत पुढे म्हणाले की, शक्तीशिवाय कोणीही ऐकत नाही, आपण मानवतेच्या कायद्याने चालतो, मात्र जगातील अनेक भाग अजूनही जंगलाच्या कायद्याने वागत आहेत, अशी टीका त्यांनी केली. त्यांनी धर्म, संस्कार आणि अनुशासन यांची गरज अधोरेखित करत समाजाने एकत्रितपणे पुढे जाण्याचे आवाहन केले. धर्माच्या अज्ञानामुळेच माणूस लोभ आणि स्वार्थाच्या मार्गावर जातो, असे सांगत त्यांनी मंदिरांना संस्कार केंद्र म्हणून महत्त्व दिले.

नैतिक मूल्यांची गरज

धर्म म्हणजे केवळ ग्रंथ नव्हे, तर तो आचरणात दिसला पाहिजे, असे सांगत भागवत यांनी शिस्त आणि नैतिक मूल्यांच्या जोपासनेवर भर दिला. वैयक्तिक कष्ट आणि सातत्यपूर्ण सरावातूनच समाजात सलोखा निर्माण होऊ शकतो. जगाला आज संघर्षाची नव्हे, तर सहकार्याची गरज असून भारताचा शांतताप्रिय स्वभावच जगाला नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Back to top button